मुंबई : वर्षभरापूर्वी करोनाकाळात केवळ  रुग्णवाहिकांचे भोंगे वाजत होते. आता बाकीचे भोंगे वाजू लागले आहेत, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांच्या पुस्तक प्रकाशनात मनसे व भाजपच्या राजकारणावर फटकेबाजी केली.

प्रसिद्ध लेखक मिनाझ मर्चंट लिखित ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या पुस्तक प्रकाशन सोहळय़ास मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचारमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, राज्यसभा सदस्य अनिल देसाई, ‘महारेरा’चे अध्यक्ष अजोय मेहता, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल उपस्थित होते.

करोना संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वानीच न खचता काम करून कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करून करोना नियंत्रणात आणला त्या ‘मुंबई मॉडेल’ची यशोगाथा ‘इकबाल सिंह चहल – कोविड वॉरियर’ या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडली जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. आयुक्त डॉ. चहल यांनी कोविडकाळात केलेल्या उपाययोजनांची माहिती प्रास्ताविकात दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनातून कोविड उपाययोजनांचे २९ विविध मॉडेल्स तयार केले. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून जम्बो कोविड केंद्रांची उभारणी झाली, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेमुळे ३५ लाख कुटुंबांपर्यंत महानगरपालिका पोहोचली, असे चहल यांनी नमूद केले. तेव्हा रुग्णवाहिका मिळत नव्हती. औषधोपचार करताना अनेक समस्या येत होत्या. मुख्यमंत्रीपदाचा मला, तर जगाला कोविडचा अनुभव नव्हता. कोविडवर अद्याप औषध आलेले नाही. आपण  करोना नियंत्रित करू शकतो, त्यावर उपचार नाही. दोन वर्षांपूर्वी फेब्रुवारीमध्ये याची वाढ व्हायला लागल्यानंतर कोविड फार भयंकर असल्याचे लक्षात आले. त्यासाठी फील्ड हॉस्पिटल गरजेचे होते. त्यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. एखाद्या संघाला काम द्यायचे तर त्याचा कर्णधार मजबूत असायला हवा नाही तर संघ खेळणार कसा; पण त्यासाठी माझ्या संघावर माझा विश्वास हवा. तो विश्वास टाकण्याचे व देण्याचे काम मी केले. जर मुख्यमंत्रीच गर्भगळीत होऊन बसला असता तर संपूर्ण राज्य बसले असते, असे ठाकरे यांनी नमूद केले. धारावीमध्ये करोना नियंत्रणात आणला त्याचे जगभरात कौतुक झाले. रुग्णालये, खाटांचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका अशा अनेक उपाययोजना केल्या. बोलणे आणि कृती यातील अंतर कमी केले म्हणून कोविडची यशोगाथा आपण या पुस्तकाद्वारे जगासमोर मांडू शकलो. कोविडकाळात महापालिका, बेस्ट आणि सर्व यंत्रणांनी न खचता केलेल्या कामाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक करत हे यश कोविडयोद्धय़ांना अर्पण केले.