मुंबई : वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने नवीन उपक्रम हाती घेतला आहे. महानगरपालिकेची चार नाट्यगृहे आणि पाच जलतरण तलावांच्या आवारात पुस्तक विक्रीसाठी प्रकाशकांना सशुल्क जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेने मराठी साहित्य विश्वातील प्रकाशकांकडून अर्ज मागवले आहेत. मराठी भाषा दिनी, २७ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाला सुरुवात करण्यात येणार आहे.
माहिती तंत्रज्ञान युगामध्ये मोबाइलच्या अतिवापरामुळे वाचन संस्कृती लोप पावत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुस्तक प्रदर्शन किंवा पुस्तकांच्या दुकानाकडे फारच मोजक्या लोकांचेच पाय वळतात. त्यामुळे पुस्तके लोकांपर्यंत पोहोचावीत यासाठी महानगरपालिकेने प्रकाशकांना जागा व सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, बोरिवलीमधील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, भायखळ्यातील अण्णाभाऊ साठे नाट्यगृह आणि मुलंडमधील कालिदास नाट्यगृहाच्या आवारात प्रकाशकांना पुस्तक विक्रीसाठी सशुल्क जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. तसेच दादर, चेंबूर, कांदिवली, दहिसर पूर्व व अंधेरी पश्चिम येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावांच्या परिसरातही अशी जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त आश्विनी भिडे यांच्या संकल्पनेतील या उपक्रमाला मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्लाब सिंह चहल यांनी नुकतीच प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने या उपक्रमासाठी प्रकाशकांकडून अर्ज मागवले आहेत.
उपलब्ध जागेच्या तुलनेत अधिक प्रकाशक पुढे आल्यास सोडत पद्धतीने निवड केली जाईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. तसेच भविष्यात वरळी, वडाळा, विक्रोळी, अंधेरी, मालाड, दहिसर, अंधेरी येथे जलतरण तलाव उभारण्यात येणार असून हा उपक्रम यशस्वी झाल्यास तेथेही प्रकाशकांना जागा उपलब्ध करण्यात येणार आहे. एका प्रकाशकाला दुसऱ्या प्रकाशकांचीही पुस्तके विक्रीस ठेवता येणार आहेत. तसेच दोन – तीन प्रकाशकांनी मिळून जागा घेण्याची तयारी दर्शविल्यास त्याला मान्यता दिली जाणार आहे. या ठिकाणी शैक्षणिक पुस्तकांची विक्री करता येणार नाही, तसेच मराठी साहित्यातील पुस्तकांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूंची येथे विक्री करता येणार नाही, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.
वाचकांना १५ टक्के सवलतीत पुस्तके
या उपक्रमासाठी प्रकाशकांना जागा, पाणी, वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच प्रकाशकांना माफक अटी घालण्यात आल्याची माहिती समन्वयक संदीप वैशंपायन यांनी दिली. या जागेसाठी सहा हजार रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. तसेच वाचकांना १५ टक्के सवलतीत द्यावी पुस्तके अशीही अट घालण्यात आली आहे. त्यामुळे या उपक्रमातून वाचकांचाही फायदा होणार आहे.