मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना धमकावणे व एक कोटींची लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने सट्टेबाज अनिल जयसिंघानीला सोमवारी मलबार हिल पोलिसांनी अटक केली. जयसिंघानीला गुजरातमधून पकडण्यासाठी गुन्हे शाखेने ७२ तास ऑपरेशन एजे राबवले. त्यापूर्वी त्याची मुलगी अनिक्षा जयसिघांनीला मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती.
अनिल जयसिघांनीला अटक करण्यासाठी गुन्हे शाखेच्या पोलिसांनीही पाच पथके तयार केली होती.अनिल जयसिंघानी हा शिर्डीतून मग गुजरातला गेला. सुरत पोलिसांनी, सुरत ग्रामीण पोलीस तसेच गोध्रा आणि इतर पोलिसांची मदत घेऊन अनिल जयसिंघानीला पकडण्याची मोहीम राबवली. बाडरेलीत त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. तेथून तो निसटला. त्यानंतर तो सुरतला गेला. बडोदा, भरूच या मार्गे गोध्रा या ठिकाणी पळून जात होता. अखेर गोध्रा येथील कलोल येथून त्याला पकडण्यात आले. जयसिंघानी याला मदत करणारा चालक व एका नातेवाईकालाही गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्याला सोमवारी मलबारहिल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. जयसिघांनीकडून एक मोबाईल व इंटरनेट उपकरण हस्तगत करण्यात आले, अशी माहिती उपायुक्त (सायबर) बाळसिंह राजपुत यांनी दिली.
अमृता फडवणीस यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी अनिक्षा आणि तिचे वडील अनिल जयसिंघानीविरोधात कलम १२०, भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ कलम ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तपासात प्रकरणी अमृता फडणवीस यांच्याकडे १० कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. असे निष्पन्न झाल्यानंतर याप्रकरणी खंडणीचे कलमही वाढवण्यात आले होते. हा संपूर्ण कट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणात अडकवण्यासाठी आखण्यात आल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला होता. अनिल जयसिंघानीची मुलगी अनिक्षा याप्रकरणी २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहे.
जयसिंघानी हा उल्हासनगर येथील कॅम्प क्रमांक १ येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात मुंबईतही २०१६ मध्ये फसवणूकीचे गुन्हे दाखल झाले होते. त्याच्यावर एकूण १५ पेक्षा जास्त गुन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ईडीच्या एका प्रकणातही त्याला सहभाग असल्याच्या संशयावरून २०१६ मध्ये गुजरात ईडीने उल्हासनगरमध्ये शोध मोहिम राबवली होती.