मुंबई : मुंबई उपनगरात अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय जाळ्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी कक्षाने कारवाईचा बडगा उगारला. कांदिवली युनिटच्या विशेष पथकाने बोरिवली (पूर्व) परिसरात एका संशयित तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत सुमारे १ कोटी ३८ लाख २० हजार रुपये किमतीचे ६९१ ग्रॅम उच्च दर्जाचे हेरॉईन जप्त करण्यात आले. या प्रकरणी अमली पदार्थ व मनःप्रभावी पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.
मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार उपनगरात ‘अमली पदार्थ मुक्त मुंबई’ मोहीम तीव्र करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर, अमली पदार्थ विरोधी कक्षाचे कांदिवली युनिट बोरिवली (पूर्व) पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. बोरिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे नजीकच्या उड्डाणपुलाजवळ एक व्यक्ती संशयितरित्या फिरताना पथकाच्या निदर्शनास आला. पोलिसांचे वाहन पाहताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. अमली पदार्थ विरोधी पथकाने तत्काळ पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याजवळ ६९१ ग्रॅम हेरॉईन सापडले. आंतरराष्ट्रीय बाजारात या हेरॉईनची किंमत सुमारे १ कोटी ३८ लाख २० हजार रुपये आहे. प्राथमिक चौकशीत आरोपी हे हेरॉईन स्थानिक पुरवठादारांपर्यंत पोहोचवण्यासाठी आला असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीने हे अमली पदार्थ बाहेरच्या राज्यातून आणल्याचा संशय पोलिसांना आहे. त्याला स्थानिक दंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता, अमली पदार्थांच्या मुख्य सूत्रधाराचा आणि आंतरराज्यीय तस्करांच्या साखळीचा शोध घेण्यासाठी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली. जप्त करण्यात आलेला साठा कलिना येथील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आला आहे.
