मुंबई : पादचाऱ्यांना अडथळामुक्त पदपथ देण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ अभियानाअंतर्गत बोरिवली (पश्चिम) परिसरात २० अनधिकृत बांधकामे आणि १५ अनधिकृत स्टॉल्सवर मंगळवारी निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामुळे एरव्ही गजबजलेले बोरिवलीतील पदपथ मोकळे दिसू लागले आहेत. पहिल्या टप्प्यात बोरिवलीतील ६ पदपथांवरील सुमारे ८ किलोमीटर परिसर अतिक्रमणमुक्त होण्याच्या मार्गावर आहेत.

पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ‘पादचारी प्रथम’ अर्थात ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ अभियान मुंबईत राबवण्याचे ठरवले आहे. ‘पादचारी प्रथम’ अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात ३२० किलोमीटर लांबीचे पदपथ अतिक्रमण संपूर्णतः हटवून नागरिकांना सुलभ चालत यावे यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ही मोहीम पालिकेने हाती घेतली असून पालिका आयुक्त आश्विनी भिडे या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी विविध विभागांमध्ये अचानक भेटी देत आहेत. अभियानाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश अश्विनी भिडे यांनी सर्व संबंधित यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत गोरेगाव ते विलेपार्ले आणि दक्षिण मुंबईतही ही मोहीम हाती घेण्यात आली होती. या कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेकडून २ जेसीबी, ५ डंपर, १० हून अधिक अधिकारी – कर्मचारी आणि २० कामगार तैनात करण्यात आले होते. तसेच कारवाईदरम्यान आवश्यक पोलीस बंदोबस्तासाठी १५ हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उपायुक्त मनीष वळंजू यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. प्रफुल तांबे यांच्या नेतृत्वाखाली संबंधित अधिकारी – कर्मचारी व कामगारांच्या पथकाने ही कारवाई केली.

पादचाऱ्यांना अडथळामुक्त पदपथ उपलब्ध

या मोहिमेअंतर्गत विविध विभागांमध्ये कारवाई करण्यात येत आहे. बोरिवली पश्चिम येथील लोकमान्य टिळक रोड, मार्केट लेन आणि बोरिवली सब वे रोड परिसरात ही कारवाई करण्यात आली. ‘पादचारी प्रथम’ अभियानाच्या पहिल्या टप्प्यात बोरिवली परिसरातील ६ पदपथांवरील एकूण सुमारे ८ किलोमीटर परिसरातील अतिक्रमणे हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कारवाईमुळे बोरिवली पश्चिम रेल्वे स्थानकातून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच परिसरातील पादचाऱ्यांना अडथळामुक्त व अधिक मोकळे पदपथ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.