मुंबई : राज्य सरकारने २०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्याचा निर्धार केला आहे. मात्र अमली पदार्थ प्रकरणात रेल्वे पोलिसांवर गंभीर आरोप होऊनही कारवाई विभागीय चौकशीपुरतीच मर्यादित राहिल्याचे समोर आले आहे. बोरिवली रेल्वे स्थानकावर अमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या प्रवाशाकडून २.४० लाख रुपयांची लाच घेऊन त्याला सोडून दिल्याच्या कथित आरोपामुळे दोन रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. मात्र, या प्रकरणात अद्याप स्वतंत्र फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. त्यामुळे लोहमार्ग पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पोलीस हवालदार लॉरेन्स नवगिरे आणि राकेश सोनवणे बोरिवली रेल्वे स्थानकात संशयित वस्तू व हत्यारे तपासणीसाठी ८ सप्टेंबर रोजी रात्रपाळीत कर्तव्यावर होते. त्यावेळी राजस्थानहून आलेला प्रवासी छोगाराम चौधरी याच्या सामानात अमली पदार्थ आढळल्याचा उल्लेख निलंबन आदेशात आहे. आरोपानुसार, संबंधित प्रवाशाविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. दैनंदिनीत नोंद करण्यात आली नाही, वरिष्ठांना माहिती देण्यात आली नाही आणि सीसीटीव्हीच्या कक्षेत तपासणी करण्याच्या एसओपीकडे दुर्लक्ष करून प्रवाशाला सीसीटीव्ही नसलेल्या रेस्ट हॉलमध्ये नेण्यात आले. त्यानंतर संबंधित प्रवाशाकडून २.४० लाख रुपये घेऊन त्याला पहाटे ४ च्या सुमारास सोडून दिल्याचा आरोप आहे.
गुन्हा नोंद कुठे ?
- या प्रकरणात विभागीय चौकशी सुरू असली, तरी आरोपामध्ये लाच स्वीकारणे आणि अमली पदार्थांसह पकडलेल्या व्यक्तीला जाणीवपूर्वक सोडून दिल्याचा मुद्दा असल्याने केवळ शिस्तभंगाची कारवाई पुरेशी ठरते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- निलंबन आदेशात अमली पदार्थ सापडल्याचा, अधिकृत नोंद न केल्याचा आणि मोठी रक्कम स्वीकारल्याचा प्रथमदर्शनी उल्लेख असूनही अद्याप स्वतंत्र गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रकरण विभागीय कारवाईपुरतेच मर्यादित ठेवले जात आहे का, अशी चर्चा सुरू आहे.
- कायदेतज्ज्ञांच्या मते, अमली औषधिद्रव्ये व मनःप्रभावी पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) अंतर्गत गुन्हे दखलपात्र स्वरूपाचे आहेत. तसेच सरकारी कर्मचाऱ्याने लाच स्वीकारल्याचा प्रथमदर्शनी आरोप असल्यास भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींचाही विचार होऊ शकतो.
- सर्वोच्च न्यायालयाने ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश या निकालात दखलपात्र गुन्ह्याची माहिती समोर आल्यास गुन्हा नोंदविणे हे पोलिसांचे कायदेशीर कर्तव्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
वरिष्ठांकडून पाठराखण ?
सूत्रांच्या माहितीनुसार, बोरिवलीतील या घटनाक्रमात एकूण सात रेल्वे पोलिसांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. मात्र, निलंबनाची कारवाई केवळ दोन कर्मचाऱ्यांवर करण्यात आली असून उर्वरित कर्मचाऱ्यांवर कारवाई का झाली नाही, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. संबंधित प्रवासी छोगाराम चौधरी याला सोडण्यात आल्याने त्याच्याकडील अमली पदार्थांचे पुढे काय झाले आणि त्यामागील साखळीचा तपास झाला का, याबाबतही प्रश्न निर्माण झाले आहेत. तसेच छोगाराम चौधरी हा कथित अमली पदार्थ घेऊन आढळून आला. तरीही त्याचा वावर बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यात आणि लोहमार्ग आयुक्तालयात आढळून आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कायदेशीर कारवाई करणार
बोरिवली अमली पदार्थ प्रकरणी दोन रेल्वे पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच विभागीय चौकशी सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यावर, दोषींविरोधात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल. – एम. राकेश कलासागर, लोहमार्ग पोलीस आयुक्त
