मुंबई : राज्य सरकार एकीकडे २०२९ पर्यंत महाराष्ट्र नशामुक्त करण्यासाठी सर्वसमावेशक अभियान राबवत असताना, पश्चिम रेल्वेवरील बोरिवली येथील अमली पदार्थ आणि प्रतिबंधित गुटखा तस्करीच्या दोन स्वतंत्र प्रकरणांत चार रेल्वे पोलिसांच्या निलंबनामुळे खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ बाळगणाऱ्या संशयितावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी २.४० लाख रुपयांची लाच घेऊन त्याला सोडल्याचा आरोप दोन पोलिसांवर आहे. तर गुटखा तस्करीशी कथित संबंधांवर आणखी दोन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. चारही प्रकरणांत विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोन हवालदार निलंबित

बोरिवली रेल्वे स्थानकावर ८ सप्टेंबर रोजी संशयित वस्तू व हत्यारे तपासण्यासाठी बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार लॉरेन्स नवगिरे आणि राकेश सोनवणे या दोघांची रात्रपाळीत नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी राजस्थानहून आलेल्या एका प्रवाशाची तपासणी करताना त्याच्याकडे अमली पदार्थ आढळल्याचे समोर आले. मात्र, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी त्याच्याशी कथित आर्थिक व्यवहार करून त्याला पहाटे चारच्या सुमारास सोडून दिल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्ही टाळून छतावर तपासणी

प्राथमिक चौकशीत दोन्ही कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांना कोणतीही माहिती न देता संशयिताला सीसीटीव्ही नसलेल्या पोलीस ठाण्याच्या छतावरील हॉलमध्ये नेऊन तपासणी केल्याचे उघड झाले आहे. दैनंदिनीत नोंद न करणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती न देणे आणि संशयिताकडून २ लाख ४० हजार रुपयांची लाच घेऊन त्याला सोडल्याचा प्राथमिक ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकारामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली. त्यामुळे दोघांवर गंभीर गैरवर्तणूक, बेजबाबदारपणा आणि शिस्तभंगाच्या कारणावरून लोहमार्ग पोलीस आयुक्त एम. राकेश कलासागर यांनी निलंबनाची कारवाई केली. निलंबनाच्या काळात त्यांना घाटकोपर येथील लोहमार्ग पोलीस मुख्यालयात दररोज हजेरी लावण्याचे तसेच पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गुटखा तस्करीशी कथित संबंध; आणखी दोघांवर कारवाई

दुसऱ्या प्रकरणात गुजरातसह इतर राज्यांतून मुंबईत होणाऱ्या प्रतिबंधित गुटखा तस्करीला कथित सहकार्य केल्याच्या आरोपांवरून बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अनिल गुजर आणि वसई रोड रेल्वे पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तुषार ठाकूर यांनाही निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक चौकशीत गुजरात-मुंबई रेल्वे मार्गावरील गुटखा तस्करीशी संबंधित व्यक्तींशी या दोन्ही कर्मचाऱ्यांचा अनधिकृत संपर्क असल्याचे निष्पन्न झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भातील निलंबनाचे आदेश लोहमार्ग पोलीस महासंचालक प्रशांत बुरडे यांनी दिले आहेत. या दोघांनाही निलंबनाच्या काळात घाटकोपर मुख्यालयात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या रेल्वे गाड्यांवर लक्ष पालघर, वसई रोड, बोरिवली, वांद्रे टर्मिनस आणि मुंबई सेंट्रल स्थानकांवर येणाऱ्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांचा गुटखा तस्करीसाठी वापर होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यात १२४७९ सूर्यनगरी एक्स्प्रेस, १२९०४ गोल्डन टेम्पल मेल, १२२१५ गरीब रथ एक्स्प्रेस, १९०३८ अवध एक्स्प्रेस, २२९३६ भावनगर एक्स्प्रेस आणि २२९१९ हरिद्वार एक्स्प्रेस (साप्ताहिक) या गाड्यांचा समावेश आहे. बेडरोलच्या कप्प्यातून तस्करीचा संशय चौकशीनुसार, गुटख्याचे साठे काळ्या बॅगमध्ये भरून रेल्वेच्या बेडरोल (चादरी-उशा) ठेवण्याच्या कप्प्यात लपवून त्यांची वाहतूक केली जात होती. यासाठी काही कंत्राटी कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

दोषींवर कठोर कारवाईचा इशारा

बोरिवली रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अमली पदार्थ आणि गुटखा तस्करीच्या प्रकरणांमध्ये प्रथमदर्शनी संशयित आढळलेल्या चारही रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणांची सखोल चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. – एम. राकेश कलासागर, लोहमार्ग पोलीस आयुक्त