उपाहारगृहे महिला बचत गटांना
राज्यातील एसटी स्थानक-आगारांचा बांधा-वापरा आणि हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर विकास करण्याचे धोरण रद्द करण्यात आले असून यापुढे महामंडळाच्या माध्यमातूनच या स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यापुढे महामंडळाच्या जागेतील उपाहारगृहे महिला बचत गटांनाच देण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली.
येवला येथील बसस्थानकाचा बीओटीच्या माध्यमातून पुनर्विकास करण्याबाबत जयंतराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना रावते बोलत होते.
आजवर बीओटीच्या माध्यमातून स्थानकांचा विकास केला जात होता. मात्र हे धोरण महामंडळाच्या फायद्याचे नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सध्या ज्या सहा स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येत होता. त्यालाही

स्थगिती देण्यात आली असून आता महामंडळच हे काम करेल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच सध्या रिक्त असलेली २४९ उपाहारगृह महिला बचत गटांना देण्यात येणार असून निविदा पद्धतीने त्यांचे वाटप होईल, असेही दिवाकर रावते यांनी यावेळी स्पष्ट केले.