कृषी सहसचिवांच्या घरातील धक्कादायक प्रकार

‘मुलगा आत्महत्या करण्याची धमकी देतोय. मला थोडे लवकर घरी जाऊ द्या’, ही काकुळतीची विनंती कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांनी धुडकावल्याने या विभागातील सह सचिव राजेंद्र घाडगे यांना पोटचा मुलगा गमवावा लागल्याची धक्कादायक घटना उघड झाली असून, या प्रकरणाची गंभीर दखल घेत, ‘याची चौकशी करावी’, असे आदेश राज्य सरकारने मुख्य सचिवांना दिले आहेत.

कोपरखैरणे येथे राहणारे कृषी विभागाचे सह सचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलास नैराश्याने घेरले होते. गेल्या आठवडय़ात, ११ ऑगस्ट रोजी दुपारी त्याचा आईशी वाद झाला. त्यानंतर त्याने वडिलांना दूरध्वनी करून ‘घरी या’, अशी विनंती केली. ‘लगेच घरी आला नाहीत, तर आत्महत्या करेन’, अशी धमकीही त्याने दिली. घाडगे यांच्या पत्नीनेही त्यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत, ‘मुलास समजावण्यासाठी घरी या’, असे सांगितले. घाडगे यांनी लगेचच वरिष्ठ अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्या कानावर ही बाब घातली आणि थोडे लवकर घरी सोडण्याची विनंती केली.

मात्र सहाय्य यांनी ही परवानगी नाकारत साडेपाचपूर्वी कार्यालय सोडण्यास अनुमती नाकारली. कार्यालयाची वेळ संपल्यानंतर घाडगे घरी जात असतानाच ‘मुलाने आत्महत्या केली’, असे सांगणारा दूरध्वनी त्यांना आला आणि त्यांच्या पायांखालची वाळूच सरकली.

या घटनेची माहिती मिळताच कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. ‘राजेंद्र घाडगे यांच्याशी आपले बोलणे झाले असून झाला प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे, असे ते म्हणाले.  याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही सविस्तर चर्चा झाली असून या गंभीर घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

तसे आदेशही मुख्य सचिवांना देण्यात आले आहेत. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी घाडगे सोलापूरला गेले असून अधिकारी पाठवून त्यांचा जबाब घ्यावा असे निर्देशही देण्यात आले आहेत’, अशी माहिती फुंडकर यांनी दिली. यासंदर्भात मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्याशी संपर्क  साधला असता, ‘घडलेला प्रकार दुर्देवी असून त्याची सखोल चौकशी करीत आहोत’, असे सांगितले. याबाबत भगवान सहाय्य यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

वरिष्ठांच्या वर्तणुकीसाठी परिपत्रक

कार्यालयात शिस्त असावीच, पण माणुसकीचा ओलावाही हवा. वरिष्ठ अधिकारी किंवा मंत्र्याने अशाप्रकारे वागणे अत्यंत चुकीचे असून यापुढे कार्यालयात वरिष्ठांनी कसे वागावे याबाबत एक परिपत्रकच काढण्यात येईल, असे कृषिमंत्री पांडुरग फुंडकर यांनी सांगितले.

सहाय्यविरोधात तक्रारी 

कृषी खात्यातील अप्पर मुख्य सचिव भगवान सहाय्य यांच्याविषयी त्यांच्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीला अनेक कर्मचारी कंटाळले असून, आज, शुक्रवारी काही कर्मचारी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे देणार आहेत.