शाळेच्या अभ्यासातून काही दिवस सुटका घेण्यासाठी घाटकोपरमधील एका ११ वर्षांच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचल्याचा प्रकार घडला आहे. मुलाच्या या कृत्यामुळे तपास करणाऱ्या पोलिसांची मोठी दमछाक झाली. मात्र मुलाला विश्वासात घेतल्यानंतर हा बनाव असल्याचे उघड झाले आणि पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुले पळणारी टोळी सक्रिय असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमांवर पसरवल्या जात आहेत. समाजमाध्यमांवरील याबाबतचे व्हिडिओ चित्रण पाहून घाटकोपरच्या अशोक नगर परिसरात राहणाऱ्या या ११ वर्षांच्या मुलाने स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला. काही दिवसांपूर्वीच या मुलाची परीक्षा संपली होती. या परीक्षेत मुलाला कमी गुण मिळाल्याने त्याला त्याचे शिक्षक ओरडले होते. त्यामुळे शाळेत जाण्यास तो टाळाटाळ करीत होता. याचदरम्यान त्याला अपहरणाची कल्पना सुचली.

बुधवारी सकाळी शाळेत जात असताना आपल्याला दोघांनी रिक्षात कोंबले. त्यानंतर दोघांनी माझे तोंड दाबले, मात्र मी त्यांच्याशी झटापट करून पळ काढल्याची बतावणी त्याने त्याच्या पालकांना केली. घाबरलेल्या पालकांनी तत्काळ शाळा गाठली. शाळेतील शिक्षकांना हा प्रकार सांगितल्यानंतर या सर्वांनी घाटकोपर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तत्काळ या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलाने वर्णन केलेल्या रिक्षाचा पोलिसांनी शोध सुरू केला. तसेच घटना घडलेल्या मार्गावरील सर्व सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण ताब्यात घेण्यात आले. मात्र पोलिसांना काहीच धागेदोरे हाती लागत नव्हते. त्यामुळे अखेर पोलिसांनी मुलाची कसून चौकशी केली असता तो वेगवेगळ्या रस्त्यांची नावे सांगू लागला. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. त्याला विश्वासात घेतल्यानंतर आपणच हा बनाव केल्याची कबुली त्याने दिली.