मुंबईः सत्ताधाऱ्यांकडून सातत्याने शेतकऱ्यांचा अवमान केला जात असून पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ताधाऱ्यांचे बाप असले तरी शेतकऱ्यांचे नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी करीत विरोधकांनी मंगळवारी विधानसभेचे कामकाज रोखले. यावेळी झालेल्या गोंधळात माजी अध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याच्या निषेधार्थ विरोधकांनी दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

काही दिवसांपूर्वी माजी मंत्री बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. त्यापूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वांरवार शेतकऱ्यांचा अवमान केल्यावरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभेत काँग्रेसचे नाना पटोले यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे शेतकऱ्यांच्या अवमानाचा मुद्दा उपस्थित केला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे नेहमीच शेतकऱ्यांचा अपमान करतात, आधी त्यांनी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्याशी केली. नंतर कर्जमाफीचे पैसे मुलामुलींच्या लग्नाला वापरा अशी वायफळ बडबड केली तर आता बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांचा अपमान केला.

शेतकऱ्याला पेरणीला पैसे मोदी देतात, शेतकऱ्यांच्या घरच्यांना कपडे, मोबाईल हेही मोदी देतात असे विधान करुन सत्ताधारी शेतकऱ्यांचा अवमान करीत असून या प्रकरणात मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी पटोले यांनी केली. मात्र सभागृहाचे कामकाज नियमाप्रमाणे चालेल असं सांगत अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी पटोले यांना बोलण्यास मज्जाव केला. त्यावर संतप्त झालेले पटोले, काँग्रेस विधिमंडळनेते विजय वडेट्टीवार, ज्योती गायकवाड आदी सदस्यांनी अध्यक्षाच्या आसनाकडे धाव घेतली. यावेळी विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांना प्रत्युत्तर देताना सत्ताधाऱ्यांनीही घोषणाबाजी करीत अध्यक्षाच्या आसनासमोरील मोकळ्या जागेत धाव घेतली. गोंधळामुळे अध्यक्ष नार्वेकर यांन सभागृहाचे कामकाज पाच मिनिटांसाठी तहकूब केले.

पुन्हा कामाकाज सुरु होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेत हस्तक्षेप करीत एखाद्या मुद्यावर भावना व्यक्त करणे वेगळे, पण विधानसभा अध्यक्षांकडे आक्रमरपणे धाव घेणे हे अत्यंत अशोभनीय आहे असे सांगत पटोले यांन विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी फडणवीस यांनी केली. पटोले यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत माफीस स्पष्ट नकार दिल्यानंतर अध्यक्ष नार्वेकर यांनी पटोले यांच्या एक दिवसाच्या निलंबनाची घोषणा केली. त्यावर संतप्त झालेल्या विरोधकांना सरकार विरोधात घोषणाबाजी करीत दिवसभराच्या कामकाजावर बहिष्कार टाकला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष आहे. नरेंद्र मोदी भाजपा व बबनराव लोणीकरांचा बाप असेल आमचा किंवा शेतकऱ्यांचा बाप असू शकत नाही. शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला आहे. एका दिवसांचे निलंबनच काय, आमदारकी व अख्खं आयुष्य शेतकऱ्यांसाठी देवू. भाजपला सत्तेचा माज आहे पण आम्ही शेतकऱ्यांचा अपमान सहन करणार नाही. शेतकऱ्यांची लढाई लढत राहणार, आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केला तरी न डगमगता शेतकऱ्यासाठी लढत राहू.-आमदार नाना पटोले