बांधकाम व्यावसायिक, बॉलिवूडमधील चित्रपट फायनान्सर आणि दाऊद गँगचा फायनान्सर युसूफ लकडावाला यांचे आर्थर रोड कारागृहात निधन झाले आहे. आज दुपारी १२ वाजता त्यांना मृत घोषित केले गेले. लकडावाला यांना जमीन बळकावल्याप्रकरणी ईडीने अटक केली होती.

युसूफ लकडावाला कर्करोगाने ग्रस्त होते आणि त्यांना ६ सप्टेंबर रोजी तुरुंगाच्या रुग्णालयात देखील दाखल करण्यात आले होते. कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले की, ७६ वर्षीय युसूफ लकडावाला कर्करोगाने ग्रस्त होते. त्यांना बुधवारी सकाळी जेजे रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयाने आज (गुरुवार) युसूफ लकडावाला यांच्या मृत्यूची माहिती दिली, असे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी युसूफ लकडावाला यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. ५० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप युसूफ लकडावाला यांच्यावर होता. तसेच त्यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि अवैधपणे जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळ्यातील जमीन बेकायदेशीररित्या लाटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. याप्रकरणी ईडीनं त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केलं होतं. त्यानंतर त्यांची २ जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली होती.

हेही वाचा- बॉलिवूड फायनान्सर युसूफ लकडावालावर ED ने केली होती कारवाई

हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळ्यातील जमीन आपल्या नावावर करण्यासाठी लकडावाला यांनी सरकारी अधिकाऱ्यांना ११.५ कोटी रुपयांची लाच दिल्याचाी माहिती ईडीनं दिली होती. लकडावाला यांनी संबंधित जमीन आपले वडील एम. ए. लकडावाला यांनी १९४९ साली खरेदी केली होती आणि नंतर १९६८ साली ती आपल्या नावावर केली असं दाखवणारी कागदपत्र तयार करवून घेतली. तसेच, लोणावळा नोदंणी कार्यालयातील मूळ कागदपत्रे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न लकडावाला यांनी केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला होता.