सन्मानजनक जागा वाट्याला न आल्याचे कारण देत बुधवारी महायुतीतील घटकपक्षांनी युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासप आणि शिवसंग्राम हे तीन घटकपक्ष युतीतून बाहेर पडून एकत्ररित्या विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची माहिती स्वाभिमानी पक्षाचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली. याशिवाय आज संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत या तिन्ही पक्षांच्या संयुक्त उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी निवडणुकीत एकमेकांच्या साथीने लढून घटकपक्ष स्वत:ची ताकद वाढविणार असल्याचेही खोत यांनी म्हटले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप यांच्यात जागावाटपावरून सुरू असलेल्या रस्सीखेचीमुळे घटकपक्ष नाराज होते. यासंदर्भात घटक पक्षांकडून शिवसेना-भाजपला वारंवार इशारेदेखील देण्यात आले होते. मात्र, जागावाटपावरून एकमेकांशी लढाई करण्यात गुंतलेले शिवसेना-भाजप घटकपक्षांना दाद देण्यास तयार नव्हते. त्यामुळे शिवसेना-भाजपच्या वागणुकीला कंटाळलेल्या महादेव जानकर यांनी घटकपक्षांच्या पाठीत खंजीर खुपसला गेला असल्याचे सांगितले.
दरम्यान, घटकपक्षांची मनधरणी करण्यासाठी शिवसेनेकडून तातडीने मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला शिवसेनेचे दिवाकर रावते, संजय राऊत हे नेते उपस्थित आहेत. तर घटकपक्षांकडून सदाभाऊ खोत, महादेव जानकर, विनायक मेटे हे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे चर्चेनंतर घटकपक्ष आपला निर्णय बदलणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.