जागा मालकाशी तडजोड करून देण्यासाठी भाडेकरूकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना माहीम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दस्तगीर ए मुल्ला यांना शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.

माहीम परिसरात एका घरमालकाने आपले घर एकाला भाडय़ाने दिले होते. उभयतांमध्ये पाच वर्षांचा करार झाला होता. मात्र त्याआधीच घर रिकामे करण्याचा तगादा मालकाने रहिवाशाकडे लावला होता. त्या वादातून मालकाने माहीम पोलीस ठाण्यात रहिवाशाविरुद्ध तक्रार केली. याप्रकरणी कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी मुल्ला यांनी रहिवाशाकडे केली. त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.