मुंबई : एका प्रकरणात तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी २५ लाखांची लाच मागितल्याप्रकरणी दिवाणी सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (५५) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला. त्यांच्या वतीने लाचेच्या रकमेतील १५ लाख रुपये स्वीकारताना माझगाव दिवाणी सत्र न्यायालयातील लिपिक चंद्रकात वासुदेव (४०) याला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

तक्रारदारांच्या पत्नीच्या कंपनीची जागा बळकावल्याप्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने मार्च २०२४ मध्ये हे प्रकरण माझगावच्या दिवाणी सत्र न्यायालयात (कर्मिशिअल सुट) वर्ग केले. माझगाव न्यायालयातील लिपीक चंद्रकात वासदेव (४०) याने तक्रारदाराची चेंबूरच्या स्टारबक्स या कॉफी शॉपमध्ये भेट घेतली. या प्रकरणी तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी २५ लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील १० लाख स्वत:साठी आणि १५ लाख अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (५५) यांच्यासाठी मागितले होते.

लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक

याबाबत तक्रारदाराने वरळी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत वासुदेव याने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाच्या परिसरात बुधवारी सापळा रचण्यात आला. लाचेच्या रकमेतील १५ लाख रुपये स्वीकारताना लिपिक चंद्रकात वासुदेव याला रंगेहाथ अटक करण्यात आली.

लाच स्वीकराल्यानंतर चंद्रकांत वासुदेव यांनी दिवाणी सत्र न्यायालयाचे (कोर्ट क्रमांक १४) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एजाजुद्दीन सलाउद्दीन काझी (५५) यांना कळवले. त्यांनी देखील लाच स्वीकारण्यास संमती दिली. या दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिंबंध अधिनिमाच्या कलम ७, ७ (अ), १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चंद्रकात वासुदेव याला १६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अद्याप अतिरिक्त सत्र न्यायाधील एजाजुद्दीन काझी यांना अटक करण्यात आलेली नाही.