मुंबई : शहरी विकासातील समान आव्हानांवर मात करण्यासाठी ब्रिक्स देशांतील शहरांनी प्रगत तंत्रज्ञान, ज्ञान, अनुभव आणि नवकल्पनांची देवाणघेवाण करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. परस्पर सहकार्यातूनच देश अधिक जवळ येतील, जागतिक विकासाला गती मिळेल आणि शहरांना शाश्वत विकास साधता येईल, असे त्यांनी सांगितले.
मुंबईतील वरळी येथे आयोजित ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह २०२६’चे उद्घाटन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत झाले. मुंबई फर्स्टच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही दोन दिवसीय परिषद आहे. या परिषदेस ब्रिक्स देशांतील शहरांचे प्रतिनिधी, महापौर, नगर नियोजन तज्ञ आणि शहरी विकास क्षेत्रातील जाणकार सहभागी झाले आहेत.
शहरे म्हणजे केवळ विटांची रचना नसून ती देशाच्या आर्थिक प्रगतीची ‘ग्रोथ इंजिन्स’ आहेत. त्यामुळे शहरीकरणाकडे समस्या म्हणून नव्हे, तर मोठी संधी म्हणून पाहण्याची गरज आहे. वेगाने होणारे शहरीकरण, हवामान पूर, उष्णतेच्या लाटा, वाहतूक कोंडी, प्रदूषण, पाणी व्यवस्थापन आणि परवडणारी घरे ही जगातील अनेक शहरांसमोरील समान आव्हाने आहेत. त्यावरील उपायही देशांच्या सीमांपलीकडे शोधावे लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहरांचा विकास केवळ उंच इमारती आणि आकर्षक ‘स्कायलाइन’पुरता मर्यादित नसावा. नागरिकांना सुरक्षित घरे, स्वच्छ हवा, सुलभ वाहतूक, दर्जेदार पायाभूत सुविधा आणि आपत्तीच्या काळात सक्षम प्रशासन मिळणे हेच यशस्वी शहरी नियोजनाचे खरे मापदंड आहेत. राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे आणि छत्रपती संभाजीनगरसह विविध शहरांमध्ये मेट्रो, रस्ते, ड्रेनेज, पुनर्विकास, परवडणारी घरे, डिजिटल सेवा, हरित पायाभूत सुविधा आणि आपत्ती व्यवस्थापनाला गती देण्यात येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.
