मुंबई: भारतीय परिचर्या परिषदेने आठवडाभरापूर्वी बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमासाठीचे पात्रता निकष शिथिल करण्याचे आदेश जारी केले होते. मात्र पर्सेंटाईल कितीपर्यंत कमी करणार याबाबत काहीही स्पष्टता नव्हती. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केलेल्या प्रवेश वेळापत्रकात पात्रता निकष शून्य करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
राज्य सरकारने यंदा सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण (जीएनएम) देणाऱ्या आठ महाविद्यालयांचे पदवी परिचर्या महाविद्यालयांत रूपांतर केले. तसेच वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या ५ परिचर्या पदवी महाविद्यालयांमधील विद्यार्थी क्षमतेत वाढ केल्याने राज्यातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या जागांमध्ये एक हजार जागांची वाढ झाली.
यामुळे राज्यातील बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमांच्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. ही वाढ मागील काही महिन्यांमध्ये करण्यात आल्याने अनेक विद्यार्थी याबाबत अनभिज्ञ होते. परिणामी, राज्यातील अनेक महाविद्यालयांतील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त राहिल्या होत्या. त्यामुळे प्रवेशासाठी मुदत वाढ देण्याबरोबरच पात्रता निकष शिथिल करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने १२ ऑक्टोबर २०२६ रोजी भारतीय परिचर्या परिषदेला पत्र पाठविले होते.
परिषदेने या पत्राची दखल घेत उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील रिट याचिकेच्या निर्णयाचा संदर्भ देत पात्रता निकष शिथिल करण्यास, तसेच प्रवेश प्रक्रियेस १५ नाेव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता दिली. बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाचे पात्रता निकष शून्य करण्यात आले आहेत. यामुळे सीईटीमध्ये शून्य पर्सेंटाईल मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. परिणामी, आतापर्यंत प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असून त्यांना दिलासा मिळणार आहे.
भारतीय परिचर्या परिषदेने १५ नोव्हेंबरपर्यंत जाहीर केलेली मुदतवाढ ही केवळ महाराष्ट्रासाठी लागू राहणार आहे. अन्य कोणत्याही राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाला त्याचा आधार घेता येणार नाही. विशेष स्थितीत देण्यात आलेली ही एकदाच लागू होणारी सवलत असल्याचे परिषदेने स्पष्ट केले. तसेच अंतिम मुदतीनंतर प्रवेशासाठी आणखी मुदतवाढ मागितल्यास ती स्वीकारली जाणार नाही. संबंधित अभ्यासक्रमांसाठी निश्चित केलेल्या अंतिम तारखेनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशास परवानगी दिली जाणार नसल्याचे परिषदेने स्पष्ट केले.
