गाळा हडप करण्यासाठी बिल्डरने पोलिसांच्या मदतीने रचलेले एक षडयंत्र उघडकीस आले आहे. या योजनेप्रमाणे बिल्डरने ‘हनी ट्रॅप’ लावून एका इस्टेट एजंटला अडकविले आणि त्याची अश्लील छायाचित्रे काढली. त्यानंतर खार पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा आरोप करून ५० लाख रुपये आणि हा गाळा देण्याची मागणी केली. लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाला तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी या पोलिसाला पकडण्यासाठी सापळा लावला. पण हा पोलीस पहिल्या मजल्यावरून उडी मारून पळून गेला.
 मनोज मोरे (नाव बदललेले) यांचा इस्टेट एजंटचा खार येथील अरोरा टॉवर मध्ये एक गाळा आहे. तेथील बिल्डर विकी अरोरा याला तो गाळा रिकामा करून हवा होता. त्यासाठी त्याने एक योजना बनवली. अरोराने मोरेशी मैत्री केली आणि त्याला ४ जून रोजी डहाणू येथील फार्म हाऊसला बोलावले. तेथे अरोराने तीन मुली आणून ठेवल्या होत्या. मोरे यांना भरपूर मद्य पाजण्यात आले. त्यानंतर एका मुलीबरोबर त्यांचे अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती बनवून ठेवल्या. ३१ जुलै रोजी मोरे यांनी खार पोलीस ठाण्यातून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष सामंत यांनी फोन केला आणि डहाणूत फार्म हाऊसवर एका महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार असल्याचे सांगितले. हे प्रकरण मिटविण्यासाठी सामंत आणि पोलीस निरीक्षक महेंद्र मेर्लेकर यांनी ५० लाख रुपये आणि अरोरा टॉवर मधील गाळा देण्याची मागणी केली होती़
..पोलिसाचे नाटय़मय पलायन
लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाने याप्रकरणी सापळा लावला आणि पहिला हप्ता म्हणून दहा लाख रुपये द्यायचे ठरले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सामंत यांच्या कार्टर रोड येथील निवासस्थानी फिर्यादी पैसे देण्यासाठी गेले. सामंतने पैसे स्विकारले पण त्यांना संशय आला. दरम्यान दार उघडून त्यांना पकडण्यासाठी आलेल्या लाचलुचपत खात्याच्या पोलिसांना बॉडी बिल्डर असणाऱ्या सामंत यांने दार अडवून रोखून धरले आणि नंतर पहिल्या मजल्यावरून उडी टाकून पलायन केले. याप्रकरणी लाचलुचपत खात्याने सुभाष सामंत, महेंद्र नेर्लेकर, बिल्डर विकी अरोरा आणि त्याचे दोन साथीदार महेश कांबळे आणि रॉबीन घोन्साल्विस यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या षडयंत्रात पोलिसांचा काही सहभाग आहे का त्याचा आम्ही तपास करत असल्याचे पोलीस उपमहानिरीक्षक विश्वास नागंरे पाटील यांनी सांगितले.