उल्हासनगरमध्ये कारवाई झालेल्या  इमारती रिकाम्या करण्याचे आदेश

उल्हासनगर : येथील कॅम्प दोन भागातील साई शक्ती इमारतीचे छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सात झाला आहे.

शहरात १९९४ ते ९५च्या काळात स्लॅबचे बांधकाम तोडल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा स्लॅब बांधण्यात आलेल्या इमारतींचा शोध घेऊन त्या तातडीने रिकाम्या करण्याचे तसेच संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश नगरविकास मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी प्रशासनाला दिले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणाही त्यांनी केली.

उल्हासनगर नगरपालिकेच्या काळात बेकायदा इमारतींचे स्लॅब पाडण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतरही अनेक बांधकाम व्यावसायिक  आणि काही रहिवाशांनी छुप्या पद्धतीने पुन्हा स्लॅब जोडणी करून इमारतीतील सदनिका विकल्या किंवा वापरात आणल्या. अशा इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे.

पंधरा दिवसांपूर्वी उल्हासनगर कॅम्प एक भागातील मोहिनी पॅलेस इमारतीचा स्लॅब कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी रात्री कॅम्प दोन भागांत साई शक्ती इमारतीचा स्लॅब कोसळून सात जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही इमारती स्लॅब पाडण्याची कारवाई झालेल्या प्रकारातील होत्या.

जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा दुर्घटनास्थळाची पाहणी केली. अशा अपघातांना आळा घालण्यासाठी स्लॅब पाडकामानंतरही पुन्हा बांधकाम करण्यात आलेल्या इमारतींची माहिती घेऊन त्या तातडीने रिकामे करण्याचे आदेश शिंदे यांनी पालिकेचे आयुक्त डॉ. राजा दयानिधी यांना दिले. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करत अशा इमारतींची माहिती मिळविण्याचे काम सुरू केल्याची माहिती आयुक्त डॉ. दयानिधी यांनी दिली. नगरपालिका काळातील पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे अशा इमारतींबाबत माहिती देण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. शहरातील सुमारे ९०० इमारतींना नोटीसा पाठविण्यात आल्याची माहिती पालिकेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. युवराज भदाणे यांनी सांगितले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे.

उल्हासनगर नगरपालिकेच्या काळात बेकायदा इमारतींचे स्लॅब पाडण्याची कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतरही अनेक बांधकाम व्यावसायिक  आणि काही रहिवाशांनी छुप्या पद्धतीने पुन्हा स्लॅब जोडणी करून इमारतीतील सदनिका विकल्या किंवा वापरात आणल्या.

मृतांची नावे

पुनीत चांदवाणी(१७), दिनेश चांदवाणी (४०), दीपक चांदवाणी (४२), मोहिनी चांदवाणी (६५), कृष्णा बजाज (२४), अमृता बजाज (५४), लवली बजाज (२०).