नायर दंत रुग्णालयाची नवी इमारत जानेवारीत कार्यरत

नायर दंत रुग्णालयावरील वाढत्या रुग्णसंख्येचा भार लक्षात घेऊन रुग्णालयातील सेवा वाढविण्यासाठी आता लवकरच ११ मजली इमारत उपलब्ध होणार आहे.

अकरा मजली इमारतीतून रुग्णसेवा

शैलजा तिवले

मुंबई : नायर दंत रुग्णालयावरील वाढत्या रुग्णसंख्येचा भार लक्षात घेऊन रुग्णालयातील सेवा वाढविण्यासाठी आता लवकरच ११ मजली इमारत उपलब्ध होणार आहे. या इमारतीमध्ये मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृह, अतिदक्षता विभागासह विद्यार्थिनींसाठी वसतिगृहही उपलब्ध होणार आहे. परिणामी, येत्या काळात रुग्णालयातील विद्यार्थ्यांची संख्याही वाढणार आहे.

नायर रुग्णालयात सध्या दरदिवशी ६०० ते ८०० रुग्ण उपचारांसाठी येतात. इतक्या मोठय़ा संख्येने येणाऱ्या रुग्णांसाठी आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी पालिकेने नायर दंत रुग्णालयाच्या आवारात ११ मजली नवी इमारत उभारली आहे. इमारतीचे कामकाज पूर्ण झाले असून जानेवारीपासून ही इमारत कार्यरत होईल. डिसेंबरमध्ये या इमारतीचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

नव्याने उभारण्यात येणाऱ्या या इमारतीमध्ये मॉडय़ुलर शस्त्रक्रियागृह, दंत प्रत्यारोपण विभाग या सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच दंतोपचारांसाठी नव्या १२० खुच्र्या या इमारतीमध्ये उपलब्ध केल्या जाणार आहेत. विविध सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे रुग्णालयातील प्रतिदिन रुग्णसंख्या एक हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या दृष्टीने निदान करण्यासाठी तीन नवीन क्ष- किरण यंत्रे, एक सीबीसीटी यंत्र इत्यादी सुविधा या इमारतीत उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे जुन्या इमारतीमध्ये रुग्णांची गर्दी होणार नाही, असे नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले.

मनुष्यबळ उपलब्ध करणार

सध्या ६२०० विद्यार्थी शिकत असून यानुसार तीन प्राध्यापक आणि दोन साहाय्यक प्राध्यापकांची आवश्यकता असून या जागाही लवकर भरण्यात येणार आहेत. तसेच या इमारतीमध्ये साफसफाई, चतुर्थश्रेणी कामगार आणि सुरक्षा कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी मध्यवर्ती खरेदी खात्याकडे केली आहे, असे अंद्राडे यांनी सांगितले.

पदवी आणि पदव्युत्तरच्या जागा वाढणार

सध्या आपल्याकडे पदवीचे ७५ विद्यार्थी असून भविष्यात ही संख्या १०० पर्यंत वाढविली जाणार आहे. या दृष्टीने २०० विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाची सुविधा या इमारतीमध्ये होणार आहे. सात ते ११ व्या मजल्यापर्यंत मुलींचे वसतिगृह असेल, अशी माहिती डॉ. अंद्राडे यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Building nair dental hospital operational january ysh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या