वांद्रे-कुर्ला स्थानक, भुयारी मार्गाच्या निविदा रद्द

मुंबई : बहुचर्चित मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील वांद्रे-कुर्ला संकुल येथील स्थानक आणि वांद्रे-कुर्ला संकुल ते ठाणे, कल्याण शिळफाटा २१ किलोमीटरचा भुयारी मार्ग या दोन्ही कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदा रद्द करण्याचा निर्णय नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनने घेतला आहे. या कामांसाठी पुन्हा निविदा काढण्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आली नसल्याची माहितीही रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांना मुंबईत तरी विलंब होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पात सुरुवातीचे स्थानक असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल येथे भुयारी स्थानक होणार आहे. ४.९० हेक्टर जागेत स्थानक उभारले जाणार असून त्यासाठी १ हजार ८०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

traffic block, Mumbai-Pune Expressway,
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर उद्या दोन तासांचा वाहतूक ब्लॉक
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Mumbai to Pune share cab fares
मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी शेअर कॅबच्या भाड्यात वाढ होणार
Railway megablock
रेल्वेचा पुन्हा मेगाब्लॉक! जाणून घ्या कोणत्या गाड्या रद्द अन् कोणत्या उशिरा धावणार…

बोगद्याचे काम, स्थानक इमारत, अन्य तांत्रिक कामे मोठय़ा प्रमाणात केली जाणार असून १६ बुलेट ट्रेनसाठी सहा फलाट आणि प्रवासी सुविधांसह आकर्षक असे भुयारी स्थानक उभारण्याचे नियोजन आहे; परंतु प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झालेली नाही. या कामांसाठी १८ फेब्रुवारी २०२१ ला निविदा काढली जाणार होती; परंतु ज्या ठिकाणी स्थानक उभारणार त्याच परिसरात करोना केंद्र आणि जवळच एक पेट्रोल पंप होता. त्यामुळे निविदा खुली करण्याला विलंब होऊ लागला आणि त्यामुळे निविदेला ११ वेळा मुदतवाढ देण्यात आली. या स्थानक उभारणीसाठी पुन्हा ७ एप्रिल २०२२ ला निविदा खुली केली जाणार होती. मात्र ही निविदा रद्द करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

बुलेट ट्रेनच्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ते शीळफाटा या २१ किलोमीटर लांबीच्या भुयारी मार्गासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने चार महिन्यांपासून निविदा प्रक्रिया सुरू केली होती. भुयारी मार्गाच्या कामालाही गती मिळेल असे वाटत असतानाच या मार्च महिन्यात खुली होणारी निविदाही रद्द करण्यात आली आहे. या बोगद्याची खोली २५ ते ४० मीटर एवढी असेल. हा भुयारी मार्ग ठाणे खाडीमार्गे जाईल. २१ किलोमीटरपैकी सात किलोमीटरचा भुयारी मार्ग हा समुद्राखालून असून हे काम करण्यासाठी नवीन ऑस्ट्रियन पद्धत अवलंबली जाणार आहे. हे काम तीन टप्प्यांत केले जाईल; परंतु त्याचीही निविदा रद्द झाल्याने या कामालाही विलंबच होणार आहे. प्रशासकीय कारणास्तव या निविदा रद्द करण्यात आल्या असून त्याची नवीन तारीख अद्यापही निश्चित नाही. त्यामुळे मुंबईतून सुरुवात होणारी ही दोन्ही कामे रखडली आहेत.