मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या विविध बांधकाम स्थळांवर हजारो कामगार कार्यरत आहेत. कामगारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आणि सुरक्षिततेच्या पद्धतींचे महत्त्व अधोरेखित करत, नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) बांधकाम स्थळांवर ‘प्रयास’ नुक्कड नाटक मालिका आयोजित केली. या मालिकेद्वारे ६ हजार कामगारांना सुरक्षेचे धडे देण्यात आले.
जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशातील पहिला मुंबई – अहमदाबाद ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या बांधकाम स्थळी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील कुशल व अकुशल कामगार काम करीत आहेत. प्रकल्पातील बांधकाम स्थळांवरील सुरक्षिततेबाबत जागरुकता निर्माण करणे, कामगारांना पटकन समजेल अशा पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी ‘प्रयास’ नावाची नाटक मालिका सुरू करण्यात आली आहे.
या मोहिमेदरम्यान, २३ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत विविध बांधकाम स्थळांवरील सुमारे ६ हजार कामगारांना कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेबाबत जागरूक करण्यात आले. या दहा दिवसांच्या मालिकेद्वारे कामगारांना बांधकाम स्थळांवर सुरक्षितता पाळण्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. कार्यक्रमादरम्यान, कलाकारांनी कामगारांना हेल्मेट, हार्नेस बेल्ट, सेफ्टी शूज आणि पीपीई (पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट) किट्ससारखे सुरक्षा उपकरण अनिवार्यपणे वापरण्यास प्रवृत्त करणारे आकर्षक आणि प्रभावशाली सादरीकरण केले.
या उपक्रमाअंतर्गत, संपूर्ण कॉरिडॉरमध्ये ४० बांधकाम स्थळांचा समावेश करण्यात आला. ज्यात गुजरातमधील २४ स्थळे आणि महाराष्ट्रमधील १६ स्थळांचा समावेश होता. या स्थळांमध्ये स्थानके, कास्टिंग यार्ड, सुरंग, आगार, पूल आणि व्हायाडक्ट (लांबलचक पूल) बांधकाम स्थळांचा समावेश होता. जिथे मोठ्या संख्येने कामगार काम करीत आहेत. या नुक्कड नाटकांद्वारे कामगारांना अनेक महत्त्वाचे आणि व्यावहारिक सुरक्षिततेचे संदेशही दिले गेले.
स्वतःच्या आणि सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेणे, सुरक्षितता नियमांचे पालन करणे, योग्य प्रशिक्षणाशिवाय काम न करणे, काम सुरू करण्यापूर्वी संभाव्य जोखमींचा आढावा घेणे, आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि काळजी राखणे असे महत्वाचे संदेश देण्यात आले.
