मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी ताशी ३२० किमी कमाल परिचालन वेग निश्चित करण्यात आला असताना, या मार्गासाठी तयार करण्यात येणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या बुलेट ट्रेनचा परिचालन वेग ताशी २४९ किमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रकल्पाचा घोषित वेग व प्रत्यक्ष वापरासाठी तयार होणाऱ्या ट्रेनचा वेग यात ताशी ७१ किमीची तफावत निर्माण झाली आहे. भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पात स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या प्रयत्नांदरम्यान ही तफावत नेमकी कशामुळे आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई-अहमदाबाद उच्च गती रेल्वे मार्गाची कमाल परिचालन क्षमता ताशी ३२० किमी असल्याचे नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) स्वत:च्या अधिकृत संकेतस्थळावर स्पष्ट केले आहे. तसेच केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्यावतीने जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीपत्रकातही या मार्गाचा निर्धारित वेग ताशी ३५० किमी, तर परिचालन वेग ताशी ३२० किमी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दुसरीकडे, बंगळुरू येथील बीईएमएलच्या कारखान्यात तयार होत असलेल्या स्वदेशी बुलेट ट्रेनच्या तांत्रिक कागदपत्रांमध्ये वेगळेच आकडे उघडकीस आले आहेत.
या ट्रेनचा निर्धारित वेग ताशी २८० किमी, तर परिचालन वेग ताशी २४९ किमी असल्याचे बीईएमएलच्या निविदा कागदपत्रांमध्ये नमूद आहे. तसेच पीआयबीद्वारे प्रसिद्ध केलेले, नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड व मध्य रेल्वेद्वारे व्हॉट्सॲपवर प्रसारित केलेल्या संदेशावरून समोर आले आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी आखण्यात आलेल्या वेगापेक्षा स्वदेशी ट्रेनचा परिचालन वेग कमी असल्याचे स्पष्ट होते.
बीईएमएल व चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी यांच्या सहकार्याने दोन स्वदेशी हायस्पीड ट्रेन तयार करण्यात येत आहेत. प्रत्येकी आठ डब्यांच्या या ट्रेनची निर्मिती बंगळुरू येथील बीईएमएलच्या रेल्वे कोच कारखान्यात केली जात आहे.
प्रवासी सुविधा
-सुमारे २०२ मीटर लांबीच्या या ट्रेनमध्ये आठ डबे असतील. त्यापैकी चार मोटार कार व चार ट्रेलर कार असतील. एका ट्रेनमधून सुमारे ५५७ प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. त्यात अपंग प्रवाशांसाठीही विशेष आसनव्यवस्था असेल.
– सात डब्यांमध्ये सामान्य श्रेणीची ३ बाय २ आसनरचना, तर एका डब्यात एक्झिक्युटिव्ह श्रेणीची २ बाय २ आसनरचना असेल.
– भविष्यात दोन आठ डब्यांच्या ट्रेन जोडून १६ डब्यांची ट्रेन चालविण्याचीही सुविधा ठेवण्यात आली आहे.
– प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी करण्यासाठी ट्रेनमध्ये प्रशस्त आसने, पुरेशी पाय ठेवण्याची जागा, सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, प्रत्येक आसनरांगेजवळ मोठ्या खिडक्या, मोबाइल व लॅपटॉपसाठी चार्जिंग पॉइंट उपलब्ध असतील.
– आधुनिक जैव-विघटक स्वच्छतागृहे, वातानुकूलन व्यवस्था आणि डब्यांमधून सहजपणे ये-जा करता यावी यासाठी बंदिस्त जोडमार्गाची सुविधा असेल.
