मुंबई : देशात बुलेट ट्रेनचे जाळे विणण्याच्या प्रयत्नांना अर्थसंकल्पात बळ देण्यात आले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याचबरोबर आता देशात सात बुलेट ट्रेन प्रकल्प राबविले जाणार आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मुंबई-पुणे, पुणे ते हैदराबादसह इतर पाच बुलेट ट्रेन प्रकल्पाची घोषणा केली.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी रविवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बुलेट ट्रेनसाठी भरघोस तरतूद केली आहे. देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम गुजरात, महाराष्ट्र, दादरा नगर हवेली येथे सुरू आहेत. पर्यावरणास अनुकूल प्रवासी प्रणालींना चालना देण्यासाठी, ७ बुलेट ट्रेन प्रकल्प विकसित केले जातील.

केंद्र सरकारने फेब्रुवारी २०१६ रोजी नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) ची स्थापना केली. यामध्ये देशभरात बुलेट ट्रेनचे जाळे विणण्यासाठी, प्रकल्पांची आखणी व अंमलबजावणी करण्याचे काम या कंपनीकडे सोपाविले. या कंपनीने देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला सप्टेंबर २०२० मध्ये मान्यता दिली.

नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एनएचएसआरसीएल) देशातील पहिला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प हाती घेतला आहे. अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसह देशभरातील प्रस्तावित असलेल्या सात हाय-स्पीड बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या कामाला गती मिळेल. मुंबई ते पुणे, पुणे ते हैदराबाद, हैदराबाद ते बंगळूर, हैदराबाद ते चेन्नई, चेन्नई ते बंगळूर, बंगळूर ते वाराणसी आणि वाराणसी ते सिलीगुडी या बुलेट ट्रेन प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन कधी सुरू होणार?

जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर देशातील पहिल्या मुंबई ते अहमदाबाद ५०८ किमी बुलेट ट्रेनचा प्रकल्प सुरू आहे. गुजरातमधील वापी ते साबरमती दरम्यान डिसेंबर २०२७ पर्यंत बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मुंबई ते साबरमती विभाग डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प हा एक अतिशय गुंतागुंतीचा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केला जाणार प्रकल्प आहे. रेल्वे रूळ, विद्युतीकरणाची कामे, सिग्नल यंत्रणा, दूरसंचार व इतर पायाभूत कामे पूर्ण झाल्यानंतर प्रकल्प पूर्ण होण्याची अचूक वेळ निश्चित करता येणार आहे.