मुंबई : ‘बुली बाई’ ॲप प्रकरणातील आरोपी विशाल सुधीरकुमार झा याला वांद्रे न्यायालयाने सर्व आरोपांतून दोषमुक्त केले. केवळ एखादे संकेतस्थळ किंवा पेज फॉलो करणे हा गुन्हा ठरत नसल्याचेही निरीक्षणही न्यायालयाने आरोपीला दोषमुक्त करताना नोंदवले.

झा याच्याविरोधात ॲप तयार करण्यात किंवा ते तयार करण्यासाठी सहआरोपींना मदत केल्याचे कोणतेही थेट पुरावे आरोपपत्रात नसल्याचे वांद्रे न्यायदंडाधिकारी आर. टी. इंगळे यांनी त्याला दिलासा देताना नोंदवले. शिवाय, सहआरोपींशी संपर्क किंवा परिचय असणे म्हणजे त्यांच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार ठरणे नव्हे. केवळ एखादे संकेतस्थळ किंवा पेज फॉलो करणे हा गुन्हा ठरत नाही, असेही दंडाधिकाऱ्यांनी झा याला त्याच्यावरील सर्व आरोपांतून दोषमुक्त करताना नमूद केले.

दरम्यान, ‘बुली बाई’ ॲपवर शंभरहून अधिक मुस्लिम महिलांची छायाचित्रे परवानगीशिवाय प्रसिद्ध करण्यात आली होती. या महिलांचा ऑनलाइन लिलाव करण्याच्या उद्देशाने ही छायाचित्रे ॲपवर प्रदर्शित केली होती. हे ॲप ‘गिटहब’वर होस्ट केले होते. या प्रकरणात झा याच्यासह अन्य आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. झा हा या प्रकरणातील पहिला दोषमुक्त होणारा आरोपी आहे. याआधी १२ एप्रिल रोजी त्याच्यासह अन्य दोन आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता.