मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महानगरपालिकेने लागोपाठ दुसऱ्यांदा नोटीस बजाविण्यात आल्यावर केंद्रीय यंत्रणांनी परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कोकणातील रिसॉर्टबद्दल चौकशी सुरू केली. दुसरीकडे, परब यांच्या रिसॉर्टच्या विरोधात २६ तारखेला चलो दापोलीचा नारा भाजपचे किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
मुंबै बँकेतील घोटाळाप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने भाजपमध्ये प्रतिक्रिया उमटली आहे. लगेचच परिवहनमंत्री अनिल परब यांच्या कोकणातील रिसॉर्टच्या विरोधात प्राप्तिकर विभागाने चौकशी सुरू केली. काही जणांवर छापे पडले. शिवसेनेने दरेकर यांच्याबरोबरच नारायण राणे यांना लक्ष्य केले आहे. राणे यांच्या बंगल्यातील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात नोटिसा बजाविण्यात आल्या. राणे पुत्र आमदार नितेश राणे यांना रत्नागिरी जिल्हा बँकेच्या निवडणूक काळात झालेल्या हिंसाचारप्रकरणी पोलीस ठाण्याची हवा खावी लागली. राणे यांच्या बंगल्याला पालिकेने नोटीस बजाविल्यानेच भाजपने परब यांच्या रिसॉर्टला लक्ष्य केल्याचे मानले जात आहे.
राणे यांच्या बंगल्याला पुन्हा नोटीस
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने आणखी एक नोटीस दिली आहे. यापूर्वी ११ मार्च रोजी पंधरा दिवसांची नोटीस दिली होती. त्याची मुदत संपण्याआधीच आता १६ मार्चला पुन्हा एकदा नोटीस दिली आहे. पंधरा दिवसांत अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पालिकेतर्फे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येईल, असा इशारा पुन्हा एकदा या नोटिसीत देण्यात आला आहे.
केंद्रीय मंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न
बदलापूर : बदलापुरातील प्रस्तावित जिमखान्याच्या टप्पा दोनच्या भूमिपूजन सोहळय़ासाठी आलेल्या केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. शनिवारी सायंकाळी बदलापूर पश्चिमेतील हेंद्रपाडा परिसरात हा भूमिपूजन सोहळा होणार होता. कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आरक्षित जागेत होत असलेल्या या जिमखान्यासाठी भूमिपूजनासाठी कोणतीही परवानगी न घेता फक्त श्रेय लाटण्याच्या प्रकारातून भूमिपूजन केल्याचा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आले.