scorecardresearch

मुंबईत पुन्हा ‘डबलडेकर’चे पर्व

‘बेस्ट’ प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर व्हावा आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढावी यासाठी ‘बेस्ट’ची जुनी ओळख असलेली डबलडेकर बस नव्या अवतारात मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे.

लंडनच्या धर्तीवर ९०० दुमजली बस धावणार डिसेंबर अखेपर्यंत २२५ बस ताफ्यात

मुंबई : ‘बेस्ट’ प्रवाशांचा प्रवास आणखी सुकर व्हावा आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमताही वाढावी यासाठी ‘बेस्ट’ची जुनी ओळख असलेली डबलडेकर बस नव्या अवतारात मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. लंडनच्या धर्तीवर मुंबईत ९०० दुमजली वातानुकूलित बसगाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या प्रस्तावाला मंगळवारी बेस्ट समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. संपूर्णपणे विजेवर धावणाऱ्या या बसगाडय़ांमुळे मुंबईकरांना सुलभ, जलद आणि किफायतशीर प्रवास करता येणार आहे.

बेस्ट समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत २०० दुमजली बसगाडय़ांचा प्रस्तावावर चर्चा झाली. बेस्ट समितीतील विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी भूमिका मांडून मुंबईकरांच्या सुविधेसाठी अधिक दुमजली बस घेण्याची उपसूचना मांडली. त्यानुसार २०० दुमजली बसऐवजी ९०० बसचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दोन कंपन्यांकडून १२ वर्षांसाठी या बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. राज्य सरकारच्या महाराष्ट्र त्द्ध हवा मोहिमेंर्तगत ९०० दुमजली वातानुकूलित विजेवरील बस असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. या वर्षांच्या अखेपर्यंत २५ टक्के म्हणजे सुमारे २२५ दुमजली बस ताफ्यात दाखल होतील. त्यानंतर ५० टक्के बस येतील. साधारण १८ ते २१ महिन्यांत या बसगाडय़ा उपक्रमाच्या सेवेत येतील, असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

भाजपचा आक्षेप

बेस्ट समितीच्या गुरुवारच्या बैठकीत बसची संख्या वाढवून ९०० करण्यात आली.  त्यावर मत मांडण्यास संधी देण्यात आली नाही. बसची संख्या दुपटीने वाढल्याने त्यासाठी ३,२०० कोटी रुपये खर्च केले जातील.  या निविदेतील त्रुटी गंभीर आहेत. दुमजली बससाठी दोन कंपन्यांची निवड झाली असून त्यांनाच जाहिरातींचे कंत्राट दिले जाणार आहे, असा आरोप बेस्ट समितीतील भाजपचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केला.

सध्या केवळ ४८ डबलडेकर

काही वर्षांपूर्वी डबलडेकर बस हे मुंबईतील ‘बेस्ट’चे प्रमुख वैशिष्टय़ होते. मात्र, कालांतराने या बसगाडय़ांची वाहतूक कमी कमी करण्यात आली. वयोमानानुसार कालबाह्य ठरलेल्या बसगाडय़ा हटवण्यात आल्या. बेस्टकडे १५ वर्षांपूर्वी ९०१ दुमजली बस, तर डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता. आता ४८ विनावातानुकूलित दुमजली बस बेस्टकडे आहेत.

प्रवासी क्षमतेत वाढ

एका दुमजली बसची प्रवासी वाहून नेण्याची क्षमता ७८ इतकी आहे. यात ६५ आसन क्षमता तर उर्वरित उभ्याने प्रवासी आहेत. तर एकमजली मोठय़ा बसची प्रवासी क्षमता ही ५४ असून यात ४२ प्रवासी आसन क्षमतेचे आहेत. तर मिनी बसची २४ आणि मिडी बसची ४२ प्रवासी वाहून नेण्याची क्षमता आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bus double decker festival mumbai again ysh

ताज्या बातम्या