scorecardresearch

ग्रामीण भागात पुन्हा मिडी बसची धाव; महामंडळाकडून आढावा घेण्यास सुरुवात

अवैध वाहतुकीला शह देण्यासाठी एसटी महामंडळाने दहा वर्षांपूर्वी राज्याच्या शहरी तसेच काही ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी मिडी बस आणल्या.

मुंबई : अवैध वाहतुकीला शह देण्यासाठी एसटी महामंडळाने दहा वर्षांपूर्वी राज्याच्या शहरी तसेच काही ग्रामीण भागांतील प्रवाशांसाठी मिडी बस आणल्या. त्यामुळे अवैध प्रवासी वाहतुकीला आळा बसलाच नाही, पण मिडी बस मात्र हद्दपार होऊ लागल्या. सध्या ५९६ मिडी बसपैकी ६४ बसच धावत आहेत. परंतु तालुका तसेच ग्रामीण भागात गावोगावी मोठय़ा आकाराच्या बसऐवजी मिडी बस चालवणे योग्य आहे का याचा पुन्हा आढावा महामंडळाकडून घेतला जात आहे. त्यानंतर मिडी बसची संख्या वाढवण्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.

 ग्रामीण भागात जाताना एसटीला होणारी अडचण येते. मोठी एसटी भरण्यास वेळही लागतो. त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशाला होणारा मनस्ताप पाहता अवैध प्रवासी वाहतुकदार आपल्याजवळील छोटय़ा वाहनातून त्यांची वाहतूक करण्यासाठी पुढे येऊ लागले. अवैध प्रवासी वाहतूकदारांवर पोलिसांमार्फत कारवाईही होऊ लागली. मात्र परिस्थितीत फारसा फरक पडला नाही. अखेर महामंडळाने २०१० पासून मुंबई महानगराबाहेरील शहर, ग्रामीण भागांत २४ आसनी मिडी बस चालवण्याचा निर्णय घेतला.

वर्ष २०१० ते २०१२ या दरम्यान मिडी बसची संख्या वाढवून ५९६ करण्यात आली. नाशिक, औरंगाबाद, नांदेड, रत्नागिरी, मिरज, माथेरानसह राज्यातील अनेक भागांत या बस धावू लागल्या. कमी अंतरावर बस चालवताना सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळत होता. परंतु ग्रामीण भागातील रस्त्यांवरून धावताना बसमध्ये होणारे तांत्रिक बिघाड, मध्येच बस बंद होणे आणि खासगी वाहतूकदारांच्या तुलनेत मिडी बसची तिकिटाची अधिक किंमत होती. त्यामुळे १०० टक्के प्रवासी आसनक्षमता आणि २५ टक्के उभ्याने प्रवासी क्षमता असतानाही मिडी बस हळूहळू कमी क्षमतेने धावू लागल्या. या बसचे विविध भागही मिळत नसल्याने, त्याच्या देखभालीसाठी येणारा खर्च अधिक व उत्पन्न कमी होऊ लागले. त्यामुळे आयुर्मान संपलेल्या व आयुर्मान न संपलेल्याही मिडी बस टप्प्याटप्प्यात भंगारात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या ६४ मिडी बसच धावत आहेत.

लवकरच चाचपणी :

आता मिडी बसची संख्या ग्प्मीण भागात पुन्हा वाढू शकते का याची चाचपणी केली जात आहे. परिवहनमत्री अनिल परब यांनी नुकतीच महामंडळाची आढावा बैठक घेतली. त्यामध्ये लांब पल्ल्याच्या एकाच मार्गावर एकापाठोपाठ एक बसेस पाठवण्याऐवजी मार्गाचे नियोजन करून कमीत कमी बसमध्ये जास्तीत जास्त प्रवासी घेऊन जाण्यावर भर देण्याच्या सूचना महामंडळाला दिल्या आहेत. याबरोबरच ग्रामीण भागात मोठय़ा आकाराच्या बसऐवजी पुन्हा मिडी बस चालविणे शक्य आहे का, प्रवाशांना त्याचा कितपत फायदा होईल, महामंडळालाही आर्थिक फटका बसणार नाही ना, याचा अभ्यास करण्यास परब यांनी महामंडळाला सांगितले आहे. त्यानुसार महामंडळाकडून याचा अभ्यास केला जाणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bus run again rural areas beginning review corporation ysh

ताज्या बातम्या