मुंबई: कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या बेस्ट बस अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने बुधवारीही येथील बस सेवा पूर्णपणे बंद ठेवली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामावर जाणाऱ्या प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विद्यार्थी आणि प्रवाशांना दीड किलोमीटर पायपीट करीत डेपो गाठावा लागला.
कुर्ला परिसरात सोमवारी रात्री भरधाव वेगात धावणाऱ्या बेस्ट बसने २० ते २५ वाहनांना धडक दिली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला, तर ४३ जण जखमी झाले. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे सोमवारी रात्रीच कुर्ला पश्चिम स्थानकात उभ्या असलेल्या सर्व बसगाड्या कुर्ला आगारात नेण्यात आल्या. कुर्ला पश्चिम स्थानकातून मंगळवारी एकही बस सोडण्यात आली नाही. परिणामी, प्रवाशांना मंगळवारी दिवसभर प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता.
हेही वाचा >>>Best Bus Accident: कुर्ल्यानंतर पुन्हा बेस्ट बसचा अपघात; सीएसटीएम परिसरात एकाला चिरडले
कुर्ला स्थानक परिसरातून बुधवारी बेस्ट सेवा सुरू होईल अशी प्रवाशांना अपेक्षा होती. मात्र या स्थानकातून बुधवारी एकही बस सोडण्यात आली नाही. कुर्ला पश्चिम येथून वांद्रे – कुर्ला संकुल परिसरात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र स्थानकातून बस सुटत नसल्याने अनेकांना पायपीट करीत कुर्ला बस आगार गाठावे लागत आहे. यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत.