by election for andheri east assembly constituency seat on november 3 zws 70 | Loksatta

शिवसेना, भाजपची कसोटी ; अंधेरी पूर्व मतदारसंघात ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक 

शिंदे गटाकडे चिन्ह तसेच प्रभावी उमेदवार नसल्याने भाजपनेच ही पोटनिवडणूक लढवावी, असा पक्षात मतप्रवाह आहे.

shivsena
( संग्रहित छायचित्र )

मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनाने रिक्त असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात ३ नोव्हेंबरला होणाऱ्या पोटिनवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या शिवसेनेची कसोटी लागणार आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाचे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर पडसाद उमटू शकतात. यामुळेच ही पोटनिवडणूक शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. शिंदे गटाकडे चिन्ह तसेच प्रभावी उमेदवार नसल्याने भाजपनेच ही पोटनिवडणूक लढवावी, असा पक्षात मतप्रवाह आहे. राष्ट्रवादीने शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला असून, काँग्रेसही पाठिंबा जाहीर करणार आहे.

शिवसेना आमदार लटके यांचे गेल्या मे महिन्यात दुबईमध्ये निधन झाले होते. शिवसेनेने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने माजी नगरसेवक मुरजी पटेल यांची उमेदवारी निश्चित केली आहे. दुसरीकडे ही जागा शिवसेनेची असल्याने ही जागा आम्हाला सोडावी, अशी भूमिका शिंदे गटाने घेतली आहे. पण शिंदे गटाकडे अद्याप कोणतेही निवडणूक चिन्ह नाही. तसेच मतदासंघात प्रभावी उमेदवारही शिंदे गटाकडे नाही. यातूनच भाजप ही पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता आहे.

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी महाविकास आघाडी म्हणून ही पोटनिवडणूक लढविणार आहेत. शिवसेनेला पोटिनवडणुकीत पाठिंबा असेल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले. नांदेड किंवा कोल्हापूरप्रमाणेच ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा सोडण्याचे सूत्र आहे. यानुसार शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय येत्या दोन-तीन दिवसांत जाहीर केला जाईल, असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.

चिन्ह कोणाकडे?

खरी शिवसेना कोणाची, हा वाद सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत ही १४ ऑक्टोबपर्यंत आहे. तोपर्यंत निवडणूक चिन्हावर निर्णय होण्याची शक्यता नाही. यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह या पोटनिवडणुकीत तरी शिवसेनेकडेच कायम राहील. शिंदे गटाकडे सध्या निवडणूक चिन्ह नाही. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढवावी, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांचे मत आहे. ही जागा भाजपने लढवायची की शिंदे गटाने आणि भाजप लढल्यास उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय केंद्रीय संसदीय मंडळाकडून घेतला जाईल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

युतीत भाजपचे बंड

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती असताना ही जागा शिवसेनेच्या वाटय़ाला गेल्याने भाजपचे माजी नगरसेवक मुरजी पटेल यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती. पटेल यांच्या बंडाला भाजप नेतृत्वाची संमती होती, असा आरोप तेव्हा शिवसेनेने केला होता. लटके यांनी पटेल यांचा १६,९६५ मतांनी पराभव केला. तरी ४५,८०८ मते मिळवून ते दुसऱ्या स्थानी होते. मुरजी पटेल यांनी निवडणूक लढविण्याची तयारीही सुरू केली आहे. मात्र भाजपच्या कार्यपद्धतीनुसार प्रदेश सुकाणू समितीत ही जागा कोणी लढवायची व उमेदवार कोण असेल, याबाबत प्रस्ताव तयार करून तो केंद्रीय संसदीय मंडळाकडे पाठविला जाईल व अधिकृत घोषणा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.

मुरजी पटेल कोण?

फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत पाच नगरसेवकांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आले होते. त्यात अंधेरी येथील प्रभाग क्रमांक ८१ चे भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांचेही नगरसेवक पद रद्द झाले होते. याप्रकरणी लघुवाद न्यायालयात प्रकरण प्रलंबित होते. या प्रभागात दुसऱ्या क्रमाकांची मते मिळवणारे शिवसेनेचे नगरसेवक संदीप नाईक यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले तर मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द केले होते. या दोन्ही नगरसेवक पतीपत्नी यांनी नगरसेवक म्हणून घेतलेले वेतन व भत्ते पालिकेला परत न केल्याचेही माहिती अधिकारात उघड झाले होते. केसरबेन व मुरजी पटेल यांनी मे २०१६ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पटेल हे त्यापूर्वी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी होते. २०१७ च्या पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

पालिका निवडणुकीत पडसाद

शिवसेना फुटीनंतर प्रथमच होत असलेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केल्यास मुंबई पालिका निवडणुकीत भाजपला आणखी बळ मिळेल. त्यामुळे ही जागा भाजपनेच लढवावी, असा ज्येष्ठ भाजप नेत्यांचा आग्रह आहे. शिवसेनेचा विजय झाल्यास मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पक्षाचे मनोबल उंचावेल. त्यामुळे पोटनिवडणुकीचे पडसाद पालिका निवडणुकीत उमटण्याचे संकेत आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2022 at 03:16 IST
Next Story
‘पीएफआय’कडून तरुणांना भडकावण्याचा प्रयत्न