मुंबई : एखादी इमारत जीवित व सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक झाली असेल, तर बहुसंख्य भाडेकरूंचा पाठिंबा असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाला काही मोजके रहिवासी रोखू शकत नाहीत, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. तसेच, भायखळ्यातील मोडकळीस आलेल्या ‘इसा बिल्डिंग’च्या पुनर्विकासाला हिरवा कंदील दाखवला.

‘म्हाडा’ कायद्याच्या कलम ‘९५-ए’अंतर्गत बजावण्यात आलेल्या निष्कासन नोटिसांना इमारतीतील रहिवाशांच्या एका गटाने आव्हान दिले होते. न्यायमूर्ती सुमन श्याम आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने या याचिका फेटाळून लावल्या. या कलमांतर्गत पुनर्विकास योजनांमध्ये अडथळा आणणाऱ्या रहिवाशांना इमारत त्वरित रिकामी करण्याबाबत नोटीस बजावण्याची तरतूद आहे. मदनपुरा येथील ८३ युनिट्स असलेल्या ‘इसा बिल्डिंग’मध्ये ६३ निवासी आणि २० व्यावसायिक गाळे आहेत. ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती आणि जमीनमालक पुदिनावाला मोहम्मद रफीक व जैनुल आबेदीन पुदिनावाला यांनी विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली (डीसीपीआर) २०२६च्या नियम ३३(७) अन्वये तिचा पुनर्विकास करण्याचा प्रस्ताव मांडला होता.

एकूण ८३ रहिवाशांपैकी ५७ जणांनी ‘कायमस्वरूपी पर्यायी निवास व्यवस्था करार’ केले होते आणि इमारतीचा ताबा सोपवला होता. याचिकाकर्त्यांसह उर्वरित रहिवाशांनी मात्र म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्याने १२ ऑगस्ट २०२६ रोजी बजावलेल्या निष्कासन नोटिसांना आव्हान दिले. त्यात त्यांनी संबंधित अधिकाऱ्याच्या अधिकारांवर प्रश्न उपस्थित केले आणि विकासकाने ‘कॉर्पस निधी’ व भाडे करारांशी संबंधित अटींचे पालन केले नसल्याचा आरोप केला. तथापि, म्हाडाच्या वतीने बाजू मांडताना महाधिवक्ता मिलिंद साठ्ये यांनी कार्यकारी अधिकाऱ्याने केलेल्या कारवाईचे समर्थन केले. कलम ९५-ए चा उद्देशच मूळात वैयक्तिक रहिवाशांमुळे पुनर्विकासात होणारा विलंब टाळणे हा आहे. तसेच, कार्यकारी अभियंत्याने म्हाडा मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या अधिकृत मंजुरीनंतरच ही कारवाई केल्याचेही साठ्ये यांनी न्यायालयाला सांगितले.

विकासकांच्या वतीने युक्तिवाद करताना, वकील कार्ल तांबोली यांनी इमारतीची दुरवस्था आणि बहुसंख्य रहिवाशांचे हित या मुद्यांवर प्रकाश टाकला. ही इमारत मोडकळीस आलेली असून अत्यंत धोकादायक स्थितीत आहे. त्यामुळे, जीवितहानीचा सतत धोका निर्माण झाला आहे. परंतु, काही मोजके रहिवासी या प्रकल्पात अडथळा आणत असल्याची बाब तांबोळी यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

म्हाडाच्या आश्वासनानंतर मार्ग मोकळा

न्यायालयानेही म्हाडा आणि विकासकाच्या युक्तिवादाची दखल घेतली. तसेच, कलम ९५-ए हे गृहनिर्माण योजनांना गती देण्यासाठी एक त्वरित प्रक्रिया उपलब्ध करून देणारी तरतूद आहे आणि त्याचे रूपांतर पूर्ण-स्वरूपाच्या दिवाणी प्रकरणात करता येणार नाही, असे स्पष्ट केले. याचिकाकर्त्यांनी भाडे आणि ‘कॉर्पस निधी’ स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर, विकासकाने ती रक्कम ‘म्हाडा’कडे जमा केली होती, याचीही न्यायालयाने नोंद घेतली. त्याचप्रमाणे, सर्व अटींची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल हे ‘म्हाडा’चे आश्वासन स्वीकारून न्यायालयाने याचिकाकर्त्या रहिवाशांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि पुनर्विकासाच्या काम पुढे नेण्याचा मार्ग मोकळा केला.