मुंबई : मध्य रेल्वेच्या भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाने डिजिटल आरोग्यसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत ‘क्यूआर कोड आधारित वास्तविक वेळ (रिअल-टाइम) रुग्ण अभिप्राय प्रणाली’ सुरू केली आहे. भारतीय रेल्वेतील अशी प्रणाली सुरू करणारे हे पहिलेच रुग्णालय ठरले आहे.

नुकताच आयोजित केलेल्या ‘वैद्यकीय दिन’ कार्यक्रमात मुख्य वैद्यकीय संचालक डॉ. ममता शर्मा यांच्या हस्ते या प्रणालीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय संचालक डॉ. एस. कनकराय, डॉ. बीना कुमारी (सीएस-II) यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, डॉक्टर, नर्सिंग अधिकारी, पॅरामेडिकल कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या नव्या प्रणालीद्वारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन करून रुग्णालयातील सेवांबाबत त्वरित अभिप्राय नोंदवता येणार आहे. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला वास्तविक वेळेत अभिप्राय मिळून सेवांमधील त्रुटी ओळखणे, आवश्यक सुधारणा करणे आणि आरोग्यसेवेची गुणवत्ता सातत्याने उंचावणे शक्य होणार आहे. तसेच या उपक्रमामुळे रुग्णांचा सहभाग वाढून आरोग्यसेवेत अधिक पारदर्शकता येणार आहे.

याच कार्यक्रमात रुग्णालयात ‘सहायता कक्ष’ सेवेचाही शुभारंभ करण्यात आला. हा सहायता कक्ष सर्व कामकाजाच्या दिवशी बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत कार्यरत राहणार असून, ओपीडी नोंदणी, डॉक्टरांच्या भेटीची वेळ, विविध विभागांचे मार्गदर्शन, निदान चाचण्या, रुग्ण दाखल करण्याची व त्याला घरी पाठविण्याची प्रक्रिया याबाबत त्वरित मदत उपलब्ध करण्यात येणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि प्रथमच रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.

‘वैद्यकीय दिना’चे औचित्य साधून

उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या वरिष्ठ डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच रेल्वे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना अधिक दर्जेदार, रुग्ण-केंद्रित आणि तंत्रज्ञानाधारित आरोग्यसेवा उपलब्ध करण्याच्या मध्य रेल्वेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यात आला.