मुंबई : मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात (राणीची बाग) आशियाई सिंह दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी महापौर रितू तावडे यांनी बुधवारी गुजरातमधील गांधीनगर येथील मुख्यमंत्री निवासात मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय या दोघांदरम्यान सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले.

भायखळ्याच्या जिजामाता उद्यानातील प्राणीसंग्रहालयाला गेल्या चार वर्षांपासून सिंहाची प्रतीक्षा आहे. आशियाई सिंहाची जोडी मिळावी यासाठी रितू तावडे यांनी पुढाकार घेऊन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना पत्र पाठवले होते. गुजरातमधील साकरबाग प्राणीसंग्रहालयातील सिंहाची जोडी मिळावी यासाठी महापौरांनी विनंती केली होती. गुजरातकडून सिंह मिळाल्यास त्याबदल्यात प्राणी किंवा पक्षी द्यावा लागणार आहे. मुंबई महापालिकेकडे २१ पेंग्विन असून पेंग्विनसह काही पक्ष्यांची यादीही सादर करण्यात आली होती. मात्र सक्करबाग प्राणीसंग्रहालयाने पेंग्विन नाकारले होते.

साकरबाग प्राणीसंग्रहालय येथून सिंहाच्या दोन जोडी मिळाव्या असा प्रस्ताव देण्यात आला होता. आशियाई सिंहांच्या (दोन नर : दोन मादी) जोडीच्या अदलाबदलीचा प्रस्ताव भायखळ्याच्या प्राणी संग्रहालयाने दिला होता. अदलाबदलीच्या प्रस्तावाला साकरबाग प्राणी संग्रहालयाने तत्वतः मान्यता दिली होती. मात्र त्याबदल्यात जिराफाच्या दोन जोडी, किंवा भारतीय एकशिंगी गेंड्याची एक जोडी किंवा कॅपुचिन माकडाची तीन जोडी उपलब्ध करून द्यावेत, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र त्यावर पुढे साकरबाग प्राणीसंग्रहालयाकडून काहीही उत्तर आले नव्हते. त्यामुळे बुधवारी रितू तावडे यांनी गुजरातमध्ये जाऊन मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांची भेट घेतली.

या भेटीवेळी भूपेंद्र पटेल, महापौर रितू तावडे यांच्यासह आमदार प्रकाश वरमोरा, गुजरात मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव संजीव कुमार, क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष जक्षय शाह, मुंबई महानगरपालिकेचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी लवकरात लवकर प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून, जुनागढचे साकरबाग प्राणिसंग्रहालय आणि मुंबई प्राणिसंग्रहालय यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गुजरात राज्य प्रशासनाला दिले. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेला लवकरच गुजरात शासनाकडून मंजुरीचे लेखी पत्र आणि सामंजस्य करार मसुदा प्राप्त होणार आहे.

गुजरातचे वन राज्यमंत्री प्रवीणकुमार माळी यांचीदेखील महापौरांनी गांधीनगर येथे भेट घेतली. मुंबई प्राणिसंग्रहालयाला आशियाई सिंह लवकर द्यावेत, यासाठी वन विभागाला योग्य ते निर्देश देण्याची विनंती महापौरांनी माळी यांना केली. त्यावर माळी यांनी महापौरांचे निवेदन स्वीकारून त्यावर तत्काळवन खात्याच्या प्रधान सचिवांना कार्यवाहीचे निर्देश दिले.

गुजरातमधील जुनागढ येथील प्रसिद्ध साकरबाग प्राणिसंग्रहालयाकडून मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयासाठी दोन जोड्या (२ नर व २ मादी) आशियाई सिंह देण्याचा प्रस्ताव आहे. या बदल्यात मुंबई प्राणिसंग्रहालयातर्फे तीन जोड्या टफ्टेड कॅपुचिन माकडे साकरबाग प्राणिसंग्रहालयास देण्यात येणार आहेत. हा अदलाबदली कार्यक्रम वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट १९७२ मधील तरतुदी, आणि केंद्रीय प्राणी संग्रहायलय प्राधिकरण यांच्या मार्गदर्शक सूचना, तसेच सर्व पशुवैद्यकीय, क्वारंटाईन, वाहतूक आणि वैधानिक आवश्यकतांची पूर्तता करून राबविण्यात येईल, असेही कळवले आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या अंतिम मान्यता प्राप्त आराखड्यानुसार राणीच्या बागेतील प्राणिसंग्रहालयात आशियाई सिंहांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक निवासस्थान सज्ज करण्यात आले आहे.