गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय व पालिका रुग्णालयेच जीवनदायी असतात. अशा रुग्णालयातील उपकरणेच नादुरुस्त असतील अथवा डॉक्टरच नसतील तर गरीबांना ‘आपुले मरण आपुल्याच डोळा’ पाहावे लागते. शासनाच्या भायखळा येथील जे.जे. रुग्णालयातील हृदयशस्त्रक्रिया विभागातील हार्टलंग मशिन बिघडल्यामुळे गेले पाच दिवस बायपास शस्त्रक्रिया ठप्प झाल्या आहेत. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्पुरते भाडय़ाने हार्टलंग मशिन घेण्याचा निर्णय रुग्णालय प्रशासनाने घेतला आहे.
जे.जे. रुग्णालयात राज्यभरातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यातही हृदयविकारावरील उपचारासाठी येथे रांग लागते ते येथील डॉक्टर उत्तम उपचार करतात म्हणूनच. येथील हृदयशस्त्रक्रिया विभागात बायपास शस्त्रक्रियेसाठी लागणारे हार्टलंग हे उपकरण २००१ साली घेण्यात आले होते. दहा वर्षांनंतर हे उपकरण बदलणे आवश्यक असल्यामुळे विभागाने मुदतीत नवीन उपकरण खरेदीसाठी प्रस्तावही पाठवले होते. त्यानुसार तीन वर्षांत दोन वेळा निविदाही काढण्यात आल्या. मात्र तीनजणांनी निविदा भरली पाहिजे हा नियम आडवा आला. मुदलात जगात हे उपकरण बनविणाऱ्या केवळ तीनच कंपन्या आहेत. यातील दोनच कंपन्या भारतात उपकरणे पुरवतात. त्यातील एकाच कंपनी निविदेत सहभागी झाली हा मुद्दा घेऊन बाबू लोकांनी वेळकाढूपणा केला. तिसऱ्यांदा निविदा काढण्यात आल्यानंतर दोन कंपन्या सहभागी झाल्या असून पुढील महिन्यापर्यंत नवीन उपकरण मिळेल, असा विश्वास हृदयशल्य चिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. कृ ष्णा भोसले यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर यांनीही परिस्थितीचा आढावा घेऊन दोन हार्टलंग मशिन खरेदी करण्याची भूमिका घेतल्याचेही डॉ. भोसले म्हणाले.
हार्टलंग मशिन बंद पडल्यामुळे गेले पाच दिवस हृदयशस्त्रक्रिया होऊ शकलेल्या नाहीत हे जसे खरे आहे तसेच पुरेसे अध्यापक व डॉक्टरांअभावी हृदयशस्त्रक्रियेची प्रतिक्षायादीही मोठी आहे. दोन दोन महिने शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना थांबावे लागत असून सध्या महिन्याकाठी ३० हृदयशस्त्रक्रिया येथे केल्या जातात. महिन्याकाठी दोनशे नवीन व २०० जुने रुग्ण बाह्य़रुग्ण विभागात उपचारासाठी येतात, असेही येथील डॉक्टरांनी सांगितले. मात्र हा सारा भार विभागातील एक प्राध्यापक, दोन सहयोगी प्राध्यापक आणि तीन अधिव्याख्यात्यांना सांभाळावा लागत आहे. प्रत्यक्षात दोन प्राध्यापक, चार सहयोगी प्राध्यपक आणि आठ अधिव्याख्याते येथे असणे आवश्यक आहे. अपुऱ्या डॉक्टरांअभावी रुग्णांचा प्रतीक्षा कालावधी जसा वाढतो तसेच डॉक्टरांनाही हक्काची सुट्टीही घेणे शक्य होत नाही. जे.जे. अधिष्ठाते डॉ. तात्याराव लहाने यांनी हार्टलंग मशिन बंद असल्याची दखल घेऊन मशिन दुरुस्तीचे आदेश जारी केले आहेत त्याचप्रमाणे भाडय़ानेही मशिन घेण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत.