सुधारित नागरिकत्व विधेयकाविरोधात (सीएए) वक्तव्य केल्याप्करणी डॉक्टर काफील खान यांना मुंबईतून अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सकडून ही कारवाई करण्यात आली. अलिगढ येथे सीएएविरोधात काढण्यात आलेल्या रॅलीत डॉक्टर काफील खान यांनी प्रक्षोभक वक्तव्य केलं होतं. त्याचप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. सहार पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

उत्तर प्रदेशातील अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली गोरखपूरमधील बीआरडी मेडिकल कॉलजचे निलंबित डॉक्टर काफील खान यांना अटक करण्यात आली. बुधवारी रात्री मुंबई विमातळावर उत्तर प्रदेश एसआयटीकडून मुंबई पोलिसांच्या मदतीने अटकेची कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर काफील खान १२ डिसेंबर रोजी अलिगढमधील सीएए विरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी प्रक्षोभक भाषण केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

काय म्हटलं होतं भाषणात ?
कफील खान याने भाषण करताना म्हटलं होतं की, “मोटा भाई देशात प्रत्येकाला हिंदू किंवा मुस्लिम कसं व्हावं हे शिकवत आहेत, पण माणूस म्हणून कसं जगावं हे नाही. आरएसएस अस्तित्वात आल्यापासूनच राज्यघटनेवरील विश्वास उडाला आहे. सीएए मुस्लिमांना द्वितीय श्रेणीचे नागरिक करत असून नंतर त्यांना एनआरसीच्या माध्यमातून त्रास दिला जाईल”. डॉक्टर कफील खान यांच्या या भाषणानंतर १३ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तेव्हापासून पोलीस त्यांचा शोध घेत होती.

मुंबईतील नागपाड्यातील आंदोलनात होणार होते सहभागी
यादरम्यान उत्तर प्रदेश पोलिसांना डॉक्टर काफील खान मुंबईतील नागपाड्यात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असल्याची माहिती मिळाली. त्याच आधारे उत्तर प्रदेशच्या एसटीएफने मुंबई पोलिसांशी संपर्क साधत मुंबई विमानतळावरुन त्यांना अटक केली.

याआधी डॉक्टर काफील खान बाबा राघव दास (बीआरडी) मेडिकल कॉलेजमधील ६० लहान मुलांच्या मृत्यूनंतर चर्चेत आले होते. ऑगस्ट २०१७ मध्ये ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने मुलांचा मृत्यू झाला होता. यानंतर कारवाई करत त्यांना पदावरुन हटवण्यात आलं होतं. पण नंतर त्यांना उत्तर प्रदेश सरकारकडून क्लीन चीट देण्यात आली.