मुंबई: ॲप-आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ गुरुवारी ॲप-आधारित कंपन्यांसोबत परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चर्चा केली. ॲपमध्ये १७ एप्रिल रोजी जर अपेक्षित बदल झाले नाहीत, तर १८ एप्रिल पासून तीन कॅब चालक आझाद मैदान येथे आमरण उपोषण करणार आहेत.

ॲप-आधारित कंपन्यांच्या मनमानी कारभाराच्या निषेधार्थ पुणे येथून १० एप्रिल रोजी तीन कॅब चालकांनी सुरू केलेली पायी पदयात्रा १५ एप्रिल रोजी आजाद मैदान येथे पोहोचली. तीन चालक १६ एप्रिलपासून उपोषण करणार होते. मात्र परिवहन विभागाकडून शुक्रवारी कंपन्याशी चर्चा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे कॅब चालकांनी उपोषण स्थगित केले आहे.

महाराष्ट्र कामगार सभा अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर म्हणाले की, अप्पर परिवहन आयुक्त भरत कळसकर यांच्या अध्यक्षतेखाली ओला, उबेर आणि रॅपिडो या ॲप-आधारित वाहतूक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी बैठक झाली.

या बैठकीत ॲप-आधारित कॅब सेवांना सरकारमान्य दर लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान रॅपिडो कंपनीने कॅब चालकांचे होत असलेले आर्थिक नुकसान मान्य करून त्यासाठी एक गुगल फॉर्म प्रसारित करण्याची घोषणा केली. त्यात चालकांनी त्यांच्या प्रवासाचे, फेरीचे स्क्रीनशॉट अपलोड केल्यास संबंधित नुकसानभरपाई थेट चालकांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे रॅपिडोच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले.

दरम्यान, ओला आणि उबर या कंपन्यांनी त्यांच्या ॲपवरील दरांमध्ये आवश्यक बदल करण्याबाबत निर्णय घेण्यासाठी सहाय्यक आयुक्तांकडे मुदत मागितली असून ती मान्य करण्यात आली आहे.

ओला, उबर आणि रॅपिडोच्या भाडेदराबाबत कंपन्याच्या प्रतिनिधींशी चर्चा झाली. त्यात दर लागू करण्यात आले असून त्याबाबतची माहिती चालकांना देण्यात येईल. – भरत कळसकर, अप्पर परिवहन आयुक्त