मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला नवी मुंबईत पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी केवळ प्रति चौरस मीटर नाममात्र एक रुपयात ३.६ एकरचा भूखंड देण्याचा निर्णय शनिवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
तिरुमला तिरूपती देवस्थानमला पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी नवी मुंबईच्या उलवे नोडमधील सेक्टर १२ मधील ३.६ एकरचा भूखंड देण्याचा निर्णय २९ फेब्रुवारी २०२४ रोजी घेण्यात आला होता. यासाठी सिडको महामंडळाच्या भूमुल्य आणि भूविनियोग धोरणानुसार या भूखंडास किंमत आकारण्यात यावी असा निर्णय सरकारने घेतला होता.
मात्र आता तिरुमला तिरूपती देवस्थानम् बोर्डने व्यंकटेश्वरा मंदिर उभारण्यासाठी वाटप करण्यात आलेल्या भूखंडाच्या प्रमाणेच पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठीही एक रुपया प्रति चौरस मीटर दराने भूखंड देण्याची तसेच इतर शुल्क सेवाकरासह माफ करावे, अशी विनंती सिडको महामंडळाकडे केली होती. त्यानुसार सिडको महामंडळाने याबाबतचा ठराव करून प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी पाठवला होता.
पद्मावती अम्मावरी देवीचे मूळ मंदिर तिरूपतीजवळील तिरूचानूर येथे आहे. हे मंदिर भगवान व्यंकटेश्वराच्या बरोबरीनेच भाविकांचे श्रध्दास्थान आहे. पद्मावती अम्मावरी देवीची अमरावती, विजयनगरम (आंध्र प्रदेश), हैदराबाद, भुवनेश्वर, चेन्नई, बंगळूर, कुरूक्षेत्र, नवी दिल्ली, जम्मू येथे मंदिर आहेत. उलवे येथेही पद्मावती अम्मावरी देवीचे मंदिर उभारल्यास पर्यटनालाही चालना मिळण्याची शक्यता आहे. मंदिर पर्यटकांचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरुन संबंधित परिसराला धार्मिक आणि सामाजिक महत्व प्राप्त होण्याची शक्यता आहे. संबंधित देवस्थानामार्फत परिसरात अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्यामुळे तिरुमला तिरूपती देवस्थानम बोर्डला पद्मावती अम्मावरी मंदिर उभारण्यासाठी वाटप केलेला भूखंड एक रुपया प्रति चौरस मीटर दराने देण्यात यावा, अशा निर्णयास मान्यता देण्यात आली.
