सलग दुसऱ्या वर्षी हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

नागपूरला होणारं यंदाचं राज्य हिवाळी अधिवेशन मुंबईतच होणार आहे. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं हे अधिवेशन मुंबईत घेतलं जाणार आहे. हा निर्णय घेण्यामागे करोनाचं सावट आणि विधान परिषद निवडणूक हेही कारणं असल्याचं बोललं जातंय.

जुलैमध्ये पावसाळी अधिवेशन संपतानाच हिवाळी अधिवेशनाची घोषणा करण्यात आली होती. यानुसार ७ डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन होईल असं ठरलं. मात्र, या अधिवेशनाला काही दिवस शिल्लक असताना देखील नागपूरमध्ये तयारीसाठी हालचाली झाल्या नाहीत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून यंदाचं हिवाळी अधिवेशन देखील नागपूर ऐवजी मुंबईलाच होईल असा तर्क लावला जात होता. अखेर हा अंदाज खरा ठरलाय.

विदर्भाबाहेर हिवाळी अधिवेशन होण्याची सहावी वेळ

विशेष म्हणजे राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्याचं निश्चित असलं तरी काही कारणाने हे अधिवेशन नागपूरला न घेता विदर्भाबाहेर होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. ही जवळपास सहावी वेळ आहे जेव्हा नागपूरचं हिवाळी अधिवेशन नागपूरला न होता इतरत्र घेण्यात आलं.

हिवाळी अधिवेशन गाजणार, नवाब मलिकांचा इशारा

दरम्यान, महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी होणार असल्याचं म्हटलं होतं. मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सध्या राज्यात सुरु असलेल्या अमली पदार्थांच्या मुद्द्यावरुन माझ्यावर बरेच आरोप केले जातील असं मलिक यांनी म्हटलं. मात्र त्याच वेळी त्यांनी आपण या आरोपांना उत्तर देताना अशी काही माहिती समोर आणणार आहोत की ज्यामुळे भाजपाच्या नेत्यांना कुठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. बऱ्याच लोकांचे बरेच कनेक्शन या ड्रग्ज प्रकरणात आहेत, असंही नवाब मलिक म्हणाले होते. वानखेडेंच्या कुटुंबियांना गोवलं जात असल्याचा आरोप चुकीचा असल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं.

७ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरु होत असून त्यामध्ये माझ्यावर भाजपाकडून बरेच आरोप आणि हल्लाबोल केला जाईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे. सध्या मी कोणत्याही नेत्याच्या आरोपाला उत्तर देऊन प्रकरणावरुन लक्ष डायव्हर्ट करु इच्छित नाही. हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक नावं समोर येणार आहेत, असं मलिक म्हणाले होते. मुंबईतील क्रूझ पार्टीच्या आयोजकांपैकी एक असणाऱ्या काशीफ खानला अटक झाल्यानंतर सखोल चौकशीमध्ये अनेकांची नावं समोर येतील. अनेकांच्या चेहऱ्यावरील मुखवटा हटेल. त्याच्याकडे किती लोकांचा पैसा आहे. त्याच्या माध्यमातून काय काय होतं आणि कोणत्या गोष्टी चालतात हे सुद्धा समोर येईल, असंही मलिक म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cabinet decided to take winter assembly session in mumbai instead of nagpur pbs

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या