मुंबई : राज्यात सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक आणि लाखभर रोजगार निर्मितीस हातभार लावणाऱ्या तब्बल ३२५ उद्योगांना मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.राज्यात उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी उद्योग विभागाने गेल्या काही वर्षांत विविध धोरणे जाहीर केली होती. त्यामध्ये ‘महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण’ आणि त्याअंतर्गत ‘फॅब’ प्रकल्पाकरिता प्रोत्साहने, महाराष्ट्राचे अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण, रेडिमेड गारमेंट निर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरिता ‘फ्लॅटेड’ गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरण आदींचा समावेश होता. महाराष्ट्राच्या नवीन औद्योगिक धोरणांच्या माध्यमातून उद्योगांना विविध सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र या सर्व धोरणांचा कालावधी संपुष्टात आला असून, राज्याचे नवीन औद्योगिक धोरण आणण्याची प्रक्रिया उद्योग विभागाने सुरू केली आहे.

विविध धोरणांच्या माध्यमातून राज्यात गुंतवणुकीसाठी अनेक उद्योजकांनी सरकारकडे प्रस्ताव दाखल केले होते. मात्र ज्या धोरणांच्या आधारे हे प्रस्ताव दाखल केले होते, ती धोरणेच आता संपुष्टात आल्यामुळे या उद्योगांचे प्रस्ताव रखडले होते. धोरणाचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर प्राप्त झालेल्या विविध घटकांच्या प्रस्तावापैकी राज्याच्या विकासाच्या दृष्टीने फायदेशीर ठरतील, अशा घटकांना प्रोत्साहने मंजूर करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली. नवीन धोरण लागू होईपर्यंत संबंधित धोरणानुसार प्रलंबित प्रस्तावांना मान्यता दिल्यास उद्योग घटकांना गुंतवणूक करणे, उद्योग घटकांना अनुदान देणे शक्य होणार आहे.

कोणकोणते प्रस्ताव?

– महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स धोरण आणि त्याअंतर्गत फॅब प्रकल्पाकरिता प्रोत्साहने धोरणाच्या अधीन राहून ३१३ उद्योगांच्या प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. या ३१३ प्रस्तावांमधून ४२ हजार ९२५ कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून ४३ हजार २४२ रोजगारनिर्मिती होणार आहे.

– अवकाश व संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरणानुसार १० प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यामधून ५६ हजार ७३० कोटी रूपयांची गुंतवणूक अपेक्षित असून १५ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– रेडिमेड गारमेंटनिर्मिती, जेम्स ॲण्ड ज्वेलरी, सूक्ष्म इलेक्ट्रॉनिक्स व अभियांत्रिकी घटक याकरिता फ्लॅटेड गाळायुक्त औद्योगिक संकुले धोरणानुसार दोन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. त्यातून एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आणि ३५ हजार रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे.