राज्यात सध्या जोरदार राजकीय घडामोडी घडत आहे. या पार्श्भूमीवर आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीसाठी महाविकास आघाडीमधील मंत्री हजर झाले असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रत्यक्ष उपस्थिती आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

राजकीय उलथापलथीच्या पार्श्वभूमीवर होणारी ही बैठकी वादळी ठरण्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून तीन नामांतराचे प्रस्ताव आणण्याची तयारी आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या बैठकीत औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाच्या नामांतराचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, बैठक सुरू होण्या अगोदर काँग्रेसचे दोन मंत्री वर्षा गायकवाड आणि अस्लम शेख हे बैठकीतून निघून गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. ते का निघून गेले याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे ठाकरे सरकार संकटात आले आहे. मंगळवारी देखील मंत्रिमंडळाची बैठक झाली होती. त्यामुळे मागील २४ तासात राज्य मंत्रिमंडळाची ही दुसरी बैठक आहे.

दरम्यान, पुणे शहराचं नाव जिजाऊनगर करावं, अशी मागणी आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काँग्रेसकडून करण्यात आल्याची देखील माहिती समोर आली आहे.

राज्यातील सुरू झालेला सत्तासंघर्ष आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे दिसत असल्याने, राज्य सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय तातडीने घेण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

शासन निर्णयांची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मागवली –

दरम्यान, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील महाविकास आघाडी सरकारला दणका दिला असून गेल्या काही दिवसांत राज्य सरकारच्या विविध खात्यांनी काढलेल्या शेकडो शासन निर्णयांची माहिती मुख्य सचिवांकडून मागवलेली आहे.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी १६० शासन निर्णयांसंदर्भात राज्यपालांकडे चार दिवसांपूर्वी तक्रार केली होती. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विविध विभागांनी घेतलेले शेकडो शासन निर्णय (जीआर) अद्यापही शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आलेले नाहीत. हजारो कोटी रुपये खर्चाचे निर्णय सरकारने तातडीने घेतले असून त्यात मोठा गैरव्यवहार असल्याचा आरोप दरेकर यांनी केला आहे.