मुंबई : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या निर्वाह व आहार तसेच शैक्षणिक साहित्य खरेदीच्या भत्त्यामध्ये महागाई निर्देशांकाचा विचार करून दुप्पट वाढ करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. राज्यात ४९० वसतिगृह सुरू असून त्यापैकी २८४ मुलांची व २०६ मुलींची वसतिगृहे आहेत. यामध्ये एकूण ५८ हजार ७०० विद्यार्थ्यांची क्षमता आहे.
सुधारित दर (सध्याचा भत्ता) –
१. निर्वाह भत्ता (दरमहा) : विभागीय स्तरासाठी १४०० रूपये (८००), जिल्हा स्तरासाठी १३०० रूपये (६००) आणि ग्रामीण/तालुका स्तरासाठी १००० रूपये (५००) इतका भत्ता देण्यात येणार आहे. मुलींना मिळणारा अतिरिक्त निर्वाह भत्ताही १०० वरून १५० रूपये इतका वाढविण्यात आला आहे.
२. शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता (वार्षिक) : इयत्ता ८ वी ते १० वीसाठी ४,५०० रुपये (३२००), ११ वी-१२ वी व पदविका अभ्यासक्रमासाठी ५ हजार रूपये (४ हजार), पदवी अभ्यासक्रमासाठी ५,७०० रुपये (४,५००) तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी ८ हजार रुपये (६०००) एवढा भत्ता मंजूर झाला आहे.
३. आहार भत्ता (दर महिना) : महापालिका व विभागीय शहरांतील वसतिगृहासाठी ५ हजार रुपये (३,५००) आणि जिल्हा स्तरावरील वसतिगृहांसाठी ४,५०० रूपये (३०००) इतका भत्ता निश्चित करण्यात आला आहे.