मुंबई : राज्यातील महापालिका, नगरपालिका आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर गणेशोत्सवात दर्शन मोहीम राबवल्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकार पुन्हा कामाला लागत असून सोमवारी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. अतिवृष्टीग्रस्त डोंगराळ भागातील गावांच्या पुनर्वसनाबाबत ठोस धोरण-योजनांचा महत्त्वाचा विषय चर्चेला येणार आहे.

 राज्यात पुढील काही महिन्यांत मुंबई, ठाणे, पुण्यासह विविध महानगरपालिकांच्या, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने हिंदूत्वाच्या पुरस्काराचा मुद्दा तापवण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने या काळात उत्सवाला महत्त्व दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  ठिकठिकाणच्या गणेश मंडळांना भेटी दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विविध गणेश मंडळांना भेट दिली. त्याकाळात मंत्रालयातील कारभार थंडावला होता. आता शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा प्रशासकीय कामाला गती देण्यासाठी सोमवारी मंत्रिमंडळ बैठक बोलावली आहे. एरवी मंत्रिमंडळ बैठक मंगळवारी-बुधवारी होते. पण आठवडय़ाची सुरुवातच मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेऊन करण्यात येणार आहे. अतिवृष्टीग्रस्तांना मदतीसह डोंगराळ भागातील गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मोठा आहे. त्यामुळे अतिवृष्टीमुळे डोंगराळ भागातील गावावरच दरड कोसळल्यास पुनर्वसनाचे ठोस धोरण-उपाययोजना ठरवण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना मदतीविषयी एका योजनेचा विषयही मंत्रिमंडळासमोर येणार असल्याचे समजते.