मुंबई : मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री या नात्याने सलग २५ वर्षे सरकारचे प्रमुख म्हणून जनसेवा केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करणारा ठराव राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात झालेल्या विकासकामांची प्रशंसा करण्यात आली. सुशासन, पायाभूत सुविधांचा विस्तार, सामाजिक सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षा या क्षेत्रांतील योगदानाचा ठरावात विशेष उल्लेख करण्यात आला आहे.

७ ऑक्टोबर २००१ ते ७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत मोदी यांनी मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री म्हणून सरकारचे नेतृत्व करताना २५ वर्षांची जनसेवा पूर्ण केली. गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांपर्यंत घरे, वीज, पाणी, स्वयंपाकाचा गॅस, स्वच्छता आणि आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचे मंत्रिमंडळाने कौतुक केले. महिला सक्षमीकरण, शेतकऱ्यांना आर्थिक मदत, युवकांसाठी रोजगाराच्या संधी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांचाही ठरावात उल्लेख आहे.

महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्राचे सहकार्य

महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट गाठण्यासाठी केंद्र सरकारचे सहकार्य महत्त्वाचे ठरत असल्याचे मंत्रिमंडळाने नमूद केले. राज्यात केंद्राच्या सहकार्याने सुमारे १२ लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू असल्याचा उल्लेख ठरावात करण्यात आला आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई मेट्रो, अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदर यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.

७०१ किलोमीटर लांबीच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दळणवळण सुधारण्यास मदत होत असल्याची नोंदही ठरावात आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी केंद्राने घेतलेल्या पुढाकाराचाही गौरव करण्यात आला.

शेतकरी, आदिवासी आणि सामान्य नागरिकांवर भर

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून राज्यातील २९ मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांना सहकार्य मिळाले असून, जुलै २०२६ पर्यंत ४.४९ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाल्याचे ठरावात नमूद आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रातील ४३ लाख घरांना मंजुरी, आयुष्मान भारत योजनेतून ४.४० कोटी नागरिकांना आरोग्य संरक्षण आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधीतून ९१ लाख शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाल्याचा उल्लेखही करण्यात आला आहे.

डिजिटल भारत, थेट लाभ हस्तांतरण, जनधन योजना, मुद्रा कर्ज आणि सौरऊर्जा योजनांमुळे आर्थिक समावेशनाला चालना मिळाल्याचे मंत्रिमंडळाने म्हटले आहे. राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भरता आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिष्ठा उंचावण्याच्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले. मोदी यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देत, विकसित भारताच्या उभारणीत महाराष्ट्र महत्त्वाची भूमिका बजावत राहील, असा विश्वास मंत्रिमंडळाने व्यक्त केला.