scorecardresearch

मुंबईतील तीन ब्रिटिशकालीन उड्डाणपुलांच्या जागी ‘केबल स्टेड’ पूल

जुने उड्डाणपूल न तोडता प्रथम नव्या पुलांची उभारणी केली जाईल.  त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही

प्रतिनिधीक छायाचित्र

मुंबई: मुंबईतील दादर टिळक उड्डाणपूल, रे रोड उड्डाणपूल, भायखळा  आणि सॅन्डहस्र्ट रोड दरम्यान असलेल्या ब्रिटिशकालीन पुल पाडून त्याऐवजी वांद्रे सी लिंकच्या धर्तीवर केबल स्टेड पूल उभारले जाणार आहे. त्याच्या प्राथमिक कामांना सुरुवात केल्याची माहिती महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून (एमआरआयडीसी)देण्यात आली.

    जुने उड्डाणपूल न तोडता प्रथम नव्या पुलांची उभारणी केली जाईल.  त्यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही.  उड्डाणपुलासाठी मुंबई पालिकेकडून निधी मिळणार असून त्याची प्रतीक्षा एमआरआयडीसीला आहे.

काही वर्षांपूर्वी झालेल्या अंधेरी स्थानकाजवळील गोखले उड्डाणपुलाच्या दुर्घटनेनंतर रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व पुलांची आयआयटीमार्फत संरचनात्मक तपासणी करण्यात आली होती. त्यात काही पुलांची संरचनात्मक दुरुस्ती, तर काही उड्डाणपुलांची पुनर्बाधणी सुचवण्यात आली. त्यानुसार अकरा पुलांच्या पुनर्बाधणीचे काम हाती घेण्याचा निर्णय झाला. हे काम मुंबई पालिकेच्या मदतीने एमआरआयडीसी करणार आहे. यामध्ये दादर पश्चिम आणि पूर्वेला जोडणाऱ्या टिळक पुलाचेही काम केले जाईल. दादर, परळ भागातील वाहतुकीची भिस्त या पुलावरच आहे. जुना उड्डाणपुल पाडून त्याऐवजी नवीन केबल स्टेड पुलाची उभारणी करण्यात येणार आहे. नवीन पुलाची लांबी ६६३ मीटर असेल. एकूण सहा मार्गिका असतील. याशिवाय भायखळा आणि सॅन्डहस्र्ट रोड स्थानकाच्या मध्ये १९२२ मध्ये उभारण्यात आलेला भायखळा उड्डाणपुल असून त्या जागी नवीन केबल स्टेड पूल उभारताना त्यावर आठ मार्गिका असतील. रे रोड रेल्वे स्थानकाजवळीलही उड्डाणपूल अशाचप्रकारे उभारताना त्याची लांबी २८० मीटर असेल.

 यामुळे माहुल रोड व बॅरिस्टर नाथ पै मार्गाचे रॅम्प नवीन प्रस्तावित पुलाला जोडले जातील. प्रस्तावित उड्डाणपुलावर कॉटन ग्रीन बाजूस पदपथ बांधला जाईल.

अतिरिक्त जागेची गरज नाही

भायखळा केबल स्टेड पूल उभारणीसाठी २०० कोटी रुपये, रे रोड येथील उड्डाणपुलासाठी १७० कोटी रुपये आणि दादर टिळक  पुलाच्या कामासाठी ३७४ कोटी रुपये खर्च येईल. पूल उभारण्यासाठी कोणत्याही अतिरिक्त जागेची आवश्यक्ता नाही. कमीत कमी खांबांत पुलाची उभारणी केली जाईल. नवीन केबल स्टेड ब्रीज आताच्या पुलाच्या ठिकाणीच बांधले जातील. पुलांवर एलईडी दिव, सेल्फी पॉईंट असतील. अपघात होणार नाही अशाप्रकारे पुलाची रचना असेल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cable stayed bridge replaces three british era flyovers in mumbai akp

ताज्या बातम्या