लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : ‘ॲसिलॉक’ या एकाच नावाखाली वेगवेगळे औषध घटक असलेली औषधे बाजारात उपलब्ध करून देणे, बंधनकारक पॅक साईजचे उल्लंघन करणे तसेच एका औषधाची मागणी असताना दुसऱ्या औषधाचा पुरवठा करणे आदी गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेडच्या पुणे, नागपूर आणि ठाणे येथील केंद्रीय वितरण गोदामांचे (सीएफए) औषध विक्री व वितरण परवाने रद्द केले आहेत.
कॅडिला फार्मास्युटिकल्स लिमिटेड या कंपनीकडून ‘ॲसिलॉक’ या एकाच ब्रँड नावाखाली वेगवेगळे औषध घटक असलेली औषधे एकाच वेळी बाजारात उपलब्ध असल्याचे एफडीएच्या तपासणीत आढळले. ‘ॲसिलॉक १५०’मध्ये रॅनिटिडिन १५० मिलीग्रॅम, तर ‘ॲसिलॉक १५० प्लस’मध्ये फॅमोटिडिन २० मिलीग्रॅम, त्याचप्रमाणे ‘ॲसिलॉक ३००’मध्ये रॅनिटिडिन ३०० मिलीग्रॅम, तर ‘ॲसिलॉक ३०० प्लस’मध्ये फॅमोटिडिन ४० मिलीग्रॅम हा मुख्य घटक असल्याचे निदर्शनास आले. कॅडिला कंपनीने उत्पादनाच्या नावामध्ये ‘प्लस’ हे चिन्ह जोडताना औषधातील मूळ सक्रिय घटक पूर्णपणे बदलले. त्यामुळे डॉक्टर, औषध विक्रेते तसेच रुग्णांमध्ये संभ्रम निर्माण होऊन चुकीचे औषध दिले जाण्याचा धोका निर्माण झाल्याचे एफडीएने कंपनीच्या ठाण्यातील भिवंडी, पुण्यातील वडकी आणि नागपूरमधील कळमेश्वर येथील गोदामांची तपासणी केली. या तपासणीमध्ये उपलब्ध असलेल्या संबंधित औषधांचा साठा विक्री आणि वितरणासाठी प्रतिबंधित करण्यात आला होता.
कंपनीला कारणे दाखवा नोटीस
या कारवाईविरोधात कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार तिन्ही ठिकाणी कंपनीला नव्याने ‘कारणे दाखवा’ नोटिसा बजावण्यात आल्या. कंपनीला २१ दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याची संधी देण्यात आली. त्यानंतर विहित कार्यपद्धतीनुसार वैयक्तिक सुनावणीही घेण्यात आली. कंपनीने सादर केलेला लेखी खुलासा आणि सुनावणीदरम्यान मांडलेले म्हणणे समाधानकारक नसल्याचे संबंधित प्राधिकाऱ्यांना आढळल्याने त्यांनी तिन्ही ठिकाणच्या गोदामाचे विक्री व वितरण परवाने रद्द केले.
पाकिटांच्या आकाराच्या नियमाचेही उल्लंघन
औषधे व सौंदर्य प्रसाधने नियम, १९४५ मधील शेड्युल पी-१ नुसार फॅमोटिडिनचे पाकिट १४ गोळ्यांचे असणे बंधनकारक आहे. मात्र ‘ॲसिलॉक १५० प्लस’ हे औषध ३० गोळ्या, तर ‘ॲसिलॉक ३०० प्लस’ हे औषध २० गोळ्यांच्या पाकिटामध्ये वितरित केले जात होते. पुणे विभागातील काही घाऊक औषध विक्रेत्यांनी ‘ॲसिलॉक १५०’ आणि ‘ॲसिलॉक ३००’ म्हणजेच रॅनिटिडिनयुक्त औषधांची मागणी नोंदवली असताना त्यांना ‘ॲसिलॉक १५० प्लस’ आणि ‘ॲसिलॉक ३०० प्लस’ म्हणजेच फॅमोटिडिनयुक्त औषधांचा पुरवठा केल्याचे तपासणीत आढळले. त्यामुळे मागणी केलेल्या औषधांऐवजी वेगळ्या औषधाचा पुरवठा केल्याची बाबही उघडकीस आली.
सुरक्षित व अचूक वापर सुनिश्चित करण्याची जबाबदारी उत्पादकाची
वेगवेगळे औषधघटक असलेल्या औषधांना देण्यात येणारे ब्रँड नाव रुग्ण, डॉक्टर आणि वितरकांमध्ये संभ्रम निर्माण करणारे नसावे. औषधांच्या सुरक्षितता आणि गुणवत्तेबरोबरच त्यांचा सुरक्षित व अचूक वापर सुनिश्चित करण्याची जबाबदारी उत्पादकाची आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे अनुपालन करून कार्यवाही करण्यात आली असून, तिन्ही कार्यालयांनी विहित कार्यपद्धतीनुसार सकारण आदेश पारित केले आहेत. – तुकाराम मुंढे, आयुक्त अन्न व औषध प्रशासन
