पुढील वर्षी सुट्टय़ांची चंगळ असून सात सुट्टय़ा रविवारला जोडून, तर चार सुट्टय़ा शुक्रवारला जोडून आल्या आहेत. चार सार्वजनिक सुट्टय़ा रविवारी आल्यामुळे नोकरदारांची ती सुट्टी मात्र हुकली आहे. ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी २०१६ मध्ये कोणते सण, उत्सव कोणत्या तारखांना व कोणत्या वारी येत आहेत, त्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
महाशिवरात्र (सोमवार, ७ मार्च), स्वातंत्र्य दिन (सोमवार, १५ ऑगस्ट), श्रीगणेश चतुर्थी (सोमवार, ५ सप्टेंबर), बकरी ईद (सोमवार, १२ सप्टेंबर), दीपावली-बलिप्रतिपदा (सोमवार, ३१ ऑक्टोबर), गुरू नानक जयंती (सोमवार, १४ नोव्हेंबर), ईद-ए-मिलाद (सोमवार, १२ डिसेंबर) या सात सुट्टय़ा रविवारला जोडून आल्या आहेत. त्यामुळे ज्यांना पाच दिवसांचा आठवडा आहे त्या नोकरदारांना सलग तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. २०१६ या वर्षांतील दिनदर्शिकांची तयारी पूर्ण झाली असून या सुट्टय़ा त्यानुसार दिल्या आहेत. मात्र सुट्टय़ांची अधिकृत यादी राज्य शासनाकडून जाहीर केली जाईल, असेही सोमण यांनी या पत्रकात म्हटले आहे.

२०१६ मधील अन्य सुट्टय़ा पुढीलप्रमाणे
प्रजासत्ताक दिन (मंगळवार, २६ जानेवारी), छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शुक्रवार, १९ फेब्रुवारी), होळी-धुलिवंदन (गुरुवार, २४ मार्च), गुड फ्रायडे (शुक्रवार, २५ मार्च), गुढीपाडवा (शुक्रवार, ८ एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (गुरुवार, १४ एप्रिल), श्रीरामनवमी (शुक्रवार, १५ एप्रिल), श्रीमहावीर जयंती (मंगळवार, १९ एप्रिल), महाराष्ट्र दिन (रविवार, १ मे), बुद्ध पौर्णिमा (शनिवार, २१ मे), रमजान ईद (बुधवार, ६ जुलै), पारसी नववर्ष दिन (बुधवार, १७ ऑगस्ट), महात्मा गांधी जयंती (रविवार, २ ऑक्टोबर), दसरा (मंगळवार, ११ ऑक्टोबर), मोहरम (बुधवार, १२ ऑक्टोबर), दीपावली-लक्ष्मीपूजन (रविवार, ३० ऑक्टोबर), ख्रिसमस-नाताळ (रविवार, २५ डिसेंबर).