एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात सामील झालेल्या अनेक रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. या कारवाईबरोबरच निलंबनाचीही कारवाई सुरूच असून एकूण २ हजार ७७६ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटीतील कर्मचाऱ्यांनी २९ ऑक्टोबरपासून पुकारलेला संप मागे घेण्याचे आवाहन धुडकावल्यानंतर महामंडळाने कर्मचाऱ्यांवर कारवाई सुरू केली. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

अनिल परब म्हणाले, “एसटीच्या संपाची ज्या संघटनेने नोटीस दिली होती त्या कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष त्यांच्यासोबत आलेले अ‍ॅड. सदावर्ते, जयश्री पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या बैठकीत विलिनीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मात्र याबाबत मी त्यांना हायकोर्टाने कमिटी स्थापन केल्याचे सांगितले. तसेच ती कमेटी अभ्यास करुन अहवाल सादर करणार आहे. त्यामुळे हायकोर्टाने आदेश दिलेले असताना मला त्या निर्णयामध्ये फेरफार करता येणार नाही. मात्र कमेटी जो अहवाल येईल त्यावर सरकार सकारात्मक विचार करेल.”

संप मागे घेण्याचे आवाहन

अनिल परब म्हणाले, “मी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. कारण अनेक लोकांची अडवणूक होत आहे. लोकांना त्रास होत आहे, हात त्रास कमी करा. विलिनीकरणाचा मुद्दा दोन-तीन दिवसात सोडवता येत नाही. यासाठी कोर्टाने कमिटीला योग्य वेळ दिलेला आहे. त्यावळेत हे काम होईल. या व्यतिरीक्त मी अन्य मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहे.” 

“सरकारला कोणत्याही कर्मचाऱ्यांचं नुकसान करायचं नाही. पण आम्ही जनतेलाही बांधिल आहोत. पर्यायी व्यवस्था देण्याची आमची जबाबदारी आहे. त्यामुळे जास्त ताणू नका. लवकरात लवकर संप मागे घ्या, चर्चा करून या प्रश्नाचं उत्तर शोधू” असं आवाहन, अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना केले.

आंदोलन करणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार

आज एसटी कर्मचारी आक्रमक झाले होते, यावर बोलतांना अनिल परब म्हणाले, “आंदोलन करणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार आहे. पण कुणाच्या संगण्यावरून किंवा भडकवण्यावरून आंदोलन करू नका. उद्या एसटी कर्मचाऱ्यांचं नुकसान झालं तर हे कोणीही नेते येणार नाहीत. या आंदोलनाला राजकीय रंग देण्याचा उद्देश नाही. परंतु, राजकारण करण्यासाठी काही लोक भडकवत आहेत, राजकारणासाठी काही लोक कामगारांना उचकवत आहेत. तुमच्या न्याय मागण्याचा अधिकार तुम्हाला आहे. पण कुणाच्या तरी सांगण्यावरून तुम्ही नुकसान करून घेऊ नका.”

राजकीय पोळी भाजा, पण

या संपामधून अनेक नेते आपल्या राजकीय पोळ्या भाजत आहेत. त्यांना अनिल परब यांनी टोला लगावला. राजकीय पोळी भाजा, पण पोळी करपणार नाही याची काळजी घ्या, असे अनिल परब म्हणाले.