कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरण ताजं असताना आता मुंबईतही विद्यार्थीनीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून सहाय्यक प्राध्यापकाचं निलंबन करण्यात आलं आहे. मुंबई महानगर पालिकेच्या अख्यारित असलेल्या बीआयएल नायर रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. फ्री प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार महानगरपालिकेने सांगितलं की, संपूर्ण तपास पूर्ण झाल्यानंतर आणि चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आरोपी-निलंबित सहाय्यक प्राध्यापकाविरुद्ध पुढील कारवाई केली जाईल. सहा महिन्यांपूर्वी मार्चमध्ये या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला एका सहाय्यक प्राध्यापकाने बोलावले आणि तिच्या खेळाविषयी विचारणा केली. ही संबंधित पीडिता खेळाडूही आहे.
नेमकं काय घडलं होतं?
फ्री प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांनंतर सहाय्यक प्राध्यापकाने तिला पुन्हा आपल्या केबिनमध्ये बोलावले. केबिनमध्ये त्यांनी तिच्या मानेला आणि कानाला अयोग्यरित्या स्पर्श केला. तिच्या नाकातील लिफ्म नोड्सची सूज तपासात असल्याचा बहाणा करत त्यांनी तिला स्पर्श केल्याचा दावा पीडितेने केला. तिला तिचे ॲप्रन काढायला सांगून तिच्या खांद्यावरही हात ठेवला. तसंच तिच्या ओठाच्या रंगांवरूनही तिला बोलले.
चौकशीमध्ये आढळलेले प्राथमिक तथ्य आणि घडलेल्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेता, मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालिक डॉ. नीलम अंद्राडे यांनी या डॉक्टरची बदली नायर रुग्णालयातून केईएम रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रशासनाने या सहयोगी प्राध्यापकाला शनिवारी निलंबित केले. मुख्यालय स्तरावरील चौकशी समितीच्या निष्कर्षानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.