मुंबई : सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वर्षभरात आणखी ९०० कॅमेरे उपनगरीय स्थानके, टर्मिनसवर बसविण्यात येतील, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली. त्यामुळे मुंबई विभागातील रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या एकूण चार हजार होणार आहे.
मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय स्थानके सीएसएमटी ते कर्जत, कसारा, खोपोली, पनवेल, अंधेरीपर्यंत विस्तारली आहेत. मुंबई विभाग हा कर्जत, कसाऱ्याबरोबरच लोणावळा, इगतपुरीपर्यंत आहे. या मार्गावरून दर दिवशी लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे हद्दीत एखादा गुन्हा घडल्यास सीसीटीव्ही कॅमेराद्वारे गुन्ह्याचा तपास करण्यास मदत होते; परंतु प्रवासी संख्या, वाढलेले गुन्हे पाहता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अपुरी संख्या, त्यांचा निकृष्ट दर्जा यामुळे मुंबई विभागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा विषय नेहमीच चर्चेत येतो. सध्या मुंबई विभागातील सर्व रेल्वे स्थानकांत सुमारे तीन हजार १०० सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आता स्थानकांवरील कॅमेऱ्यांची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
लवकरच स्थानकांमध्ये सुमारे ९०० कॅमेरे बसवण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त जितेन्द्र श्रीवास्तव यांनी दिली. यासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून वर्षभरात मुंबई विभागातील बहुतांश स्थानकांत नवीन कॅमेरे बसवण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सीएसएमटी उपनगरीय स्थानक आणि टर्मिनसवर सुमारे ३०० कॅमेरे असून त्यात आणखी २५ नवीन कॅमेऱ्यांची भर पडेल. लोकमान्य टिळक टर्मिनसवरही आणखी २५ कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. याशिवाय कुर्ला, घाटकोपर, ठाणे, कल्याण, डोंबिवली यासह मुख्य मार्ग, हार्बर तसेच ठाणे ते वाशी, पनवेल या ट्रान्स हार्बरवरील, लोणावळा, कर्जत, कसारा, इगतपुरीपर्यंतच्याही काही स्थानकांवरील कॅमेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.

बॉडी कॅमेरा
रेल्वे स्थानकांतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये सर्व घटना कैद होतात. मात्र धावत्या रेल्वेत प्रवाशांकडून होणारी गैरवर्तणूक, रेल्वे कर्मचारी, अन्य सुरक्षा कर्मचारी आणि प्रवाशांची वागणूक, तसेच संवाद, एखाद्या गुन्हेगाराच्या हालचाली टिपण्यासाठी मध्य रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना ‘बॉडी कॅमेरा’ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असे ४० कॅमेरे सुरक्षा दलाच्या जवानांना मिळतील, अशी माहितीही श्रीवास्तव यांनी दिली. मुंबई विभागात लांब पल्ल्याच्या गाडय़ांमध्ये याचा वापर जवानांकडून केला जाईल. एकदा चार्ज केल्यानंतर दहा तास हा कॅमेरा वापरता येतो, तर ३० दिवसांपर्यंत चित्रमुद्रण सुरक्षित ठेवता येऊ शकते.
प्रकाश योजनेत सुधारणा
मध्य रेल्वेच्या काही उपनगरीय स्थानकातील फलाटांवर अंधार होत असल्यामुळे चोरी आणि अन्य घटना घडतात. प्रवाशांच्या सूचना व रेल्वेने घेतलेल्या आढाव्यानंतर काही रेल्वे स्थानकांतील प्रकाश व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणी नव्याने प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे.