केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अन्न आणि औषध प्रशासनाने खाद्यतेलातील भेसळ रोखण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत राज्यभरातून खाद्यतेलाचे २७० नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. या नमुन्यांचा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार १ ते १४ ऑगस्टदरम्यान खाद्यतेल तापणसीची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा आजचा (रविवारी) अखेरचा दिवस आहे. असे असले तरी दैनंदिन तपासणीअंतर्गत भेसळयुक्त खाद्यतेलावर एफडीएची नजर असणार आहे. दरम्यान, विशेष मोहिमेअंतर्गत एफडीएने मुंबईसह राज्यभर छापे टाकून कोट्यवधी रुपये किमतीचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त केले. विशेष मोहिमेअंतर्गत नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई करण्यात आली. नाशिकमधील मेसर्स माधुरी रिफायनर्स प्रा.लिमिटेड या आस्थापनेवर छापा टाकून एक कोटी १० लाख ११ हजार २८० रुपये किंमतीचा भेसळयुक्त खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.

नमुने दर्जाहिन आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई –

राज्यभरातून या मोहिमेअंतर्गत खाद्यतेलाचे २७० नमुने ताब्यात घेण्यात आले आहेत. यात खाद्यतेलाचे २५०, वनस्पती ९ आणि एमएसईओच्या तेलाच्या ११ नमुन्यांचा समावेश आहे. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. यासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर नमुने दर्जाहिन आढळल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. या विशेष मोहिमेमधून राज्यभर भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खाद्यतेल खरेदी करताना ग्राहकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.